रूळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झालेली पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेची सेवा वारंवार खंडित होताना दिसत आहे. आज सकाळी सायन आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुंबईहून ठाण्याकडे जाणारी डाऊन मार्गावरील वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली. सध्या धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वे सेवा पुर्ववत होण्यासाठी किती वेळ लागणार याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही.
कालच अंबरनाथ येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे रखडली होती. याशिवाय, गेल्याच आठवड्यात दिवा येथे पेंटोग्राफ तुटल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत मोटरमनवर हल्लाही केला होता.