मेगाब्लॉकचे काम संपून गाडय़ा सुरळीत होण्याची वेळ आली असतानाच रविवारी संध्याकाळी अचानक मध्य रेल्वेवरील परळ रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि रेल्वे गाडय़ांच्या ११ फेऱ्या रद्द करण्याची वेळ रेल्वेवर ओढवली. परिणामी, प्रवाशांचा अर्धा-पाऊण तास खोळंबा झाला.
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करीरोड दरम्यान कामानिमित्त रविवारी दुपारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. सायंकाळी ५.३० च्या सुमारास मेगाब्लॉक संपला आणि रेल्वे गाडय़ा हळूहळू मार्गस्थ होऊ लागल्या. मात्र सायंकाळी ६ च्या सुमारास परळ रेल्वे स्थानकाजवळील सर्व सिग्नल अचानक लाल झाले. या प्रकारामुळे मोटरमनही बुचकळ्यात पडले. हिरवा सिग्नल मिळत नसल्याने रेल्वे मार्गावर गाडय़ांची रांग लागली. अखेर सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रवाशांना कळले  आणि प्रवाशांमध्ये रेल्वेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. अर्धा तास खोळंबा झाल्यानंतर हळूहळू रेल्वेगाडय़ा धावू लागल्या.