दर दिवशी काही ना काही कारणाने दिरंगाईने धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीला बुधवारी ठोस कारण मिळाले आणि ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या एका डब्यात बिघाड झाल्याने ही गाडी मुंब्रा व दिवा या स्थानकांदरम्यान बंद पडली. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक चांगलीच रखडली. त्याचा परिणाम मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवरही झाला. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कल्याणकडे जाणारी गाडी मुंब्रा व दिवा स्थानकाच्या मध्ये असताना सकाळी साडेसातच्या सुमारास या गाडीच्या एका डब्यात बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी दोन स्थानकांमध्येच खोळंबली. या गाडीच्या मागे असलेल्या पाच गाडय़ाही रखडल्या. तर इतर धीम्या गाडय़ांची वाहतूक डाउन जलद मार्गावर वळवण्यात आली. त्यामुळे या गाडय़ा ठाणे ते दिवा या दरम्यान कोणत्याही स्थानकावर थांबत नव्हत्या.
हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी अध्र्या तासापेक्षा जास्त कालावधी लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू होती. अखेर डब्यातील बिघाड दुरुस्त करून ही गाडी पुढे नेण्यात आली. मात्र या घटनेचा परिणाम मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ांच्या वाहतुकीवरही जाणवत होता. ही वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने चालू होती. दुपारी उशिरापर्यंत मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.