मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर येथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना आता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सोडण्याचे नियोजन आहे. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या चार रेल्वेगाड्या आणि दादरवरून सुटणारी एक रेल्वेगाडी एलटीटी येथे स्थलांतरित करण्यात येईल. त्यामुळे मुंबईतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता एलटीटी गाठण्यासाठी किंवा एलटीटीवरून मुंबई शहर गाठण्यासाठी खूप कसरत करावी लागेल. प्रवाशांना जादा पैसे खर्च करून, रिक्षा-टॅक्सीने प्रवास करावा लागेल.
गाडी क्रमांक १६३३१ सीएसएमटी ते तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३५१ सीएसएमटी ते नागरकोइल एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३३९ सीएसएमटी ते नागरकोइल एक्स्प्रेस आता सीएसएमटीऐवजी एलटीटीवरून सोडण्याचे नियोजन आहे.
तर, गाडी क्रमांक १६३३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३५२ नागरकोइल ते सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३४० नागरकोइल ते सीएसएमटी एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा प्रवास सीएसएमटीऐवजी एलटीटी येथे समाप्त होईल. दोन्ही दिशेकडील रेल्वेगाडीचे सीएसएमटी, दादर हे थांबे कायमस्वरूपी रद्द होतील. ठाणे, कर्जत हे थांबेही रद्द करण्याची योजना आहे. गाडी क्रमांक २२६२९ दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस ही देखील एलटीटीवरून सुटेल. तर, गाडी क्रमांक २२६२९ तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेसची सेवा आता एलटीटी येथे समाप्त होईल.
विदर्भातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
गाडी क्रमांक १२१११ सीएसएमटी ते अमरावती एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल. ही रेल्वेगाडी रात्री ८.१० वाजता सीएसएमटीवरून सुटते. तिच्या वेळेत बदल करून ती सीएसएमटीवरून रात्री ८.५० वाजता सुटेल. तसेच या रेल्वेगाडीच्या पुढील थांब्यातील वेळेत बदल होईल. तसेच गाडी क्रमांक १२२८९ सीएसएमटी ते नागपूर दुरांतो एक्स्प्रेस सायंकाळी ७.५५ वाजता सीएसएमटीवरून सुटते.
तर, सुधारित वेळेनुसार ही रेल्वेगाडी सीएसएमटीवरून रात्री ८.३५ वाजता सुटेल. तसेच या रेल्वेगाडीच्या पुढील थांब्यात त्यानुसार बदल होतील. तसेच गाडी क्रमांक १२२९० नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस पूर्वी नागपूरवरून सायंकाळी ७.५५ वाजता सुटत होती. आता ही रेल्वेगाडी नागपूरवरून रात्री ८ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीच्या पुढील थांब्यातील वेळेत बदल होईल. या रेल्वेगाडीच्या बडनेरा या स्थानकात ही रेल्वेगाडी रात्री १०.५० ऐवजी रात्री १०.२० वाजता येईल. त्यानंतर दोन मिनिटे थांबा घेऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. भुसावळ येथे रात्री १.३० ऐवजी रात्री १ वाजता येईल. पाच मिनिटे थांबून ती पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. इगतपुरी येथे पहाटे ५.१५ ऐवजी पहाटे ४.५० वाजता येईल. या स्थानकातही पाच मिनिटांचा थांबा घेऊन, सीएसएमटीकडे रेल्वेगाडी रवाना होईल. सीएसएमटी येथे रात्री ८.०५ ऐवजी सायंकाळी ७.५० वाजता पोहचेल.
