वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेवरील बिघाडसत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. बुधवारी सकाळी ७ ते १० या तीन तासांत तीन ठिकाणी रेल्वे रुळांना तडे आणि एका ठिकाणी इंजिनमध्ये बिघाड अशा घटनांमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. या बिघाडांमुळे ऐन गर्दीच्या वेळी सात सेवा रद्द करण्यात आल्या, तर ४० उपनगरीय सेवांवर विपरीत परिणाम झाला. तर मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होती.

कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस उद्योगनगरी एक्स्प्रेस ही गाडी मुंबईकडे येताना बुधवारी सकाळी ७.३०च्या सुमारास दिवा स्थानकाजवळ या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मुंबईकडे येणारी जलद गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण ते दिवा या स्थानकांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका असली, तरी दिवा-ठाणे या स्थानकांदरम्यान या मार्गावरील वाहतूक पुन्हा तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेवर वळवली जात असल्याचा फटका उपनगरीय रेल्वेगाडय़ांना बसला. हे इंजिन दुरुस्त होण्यास अध्र्या तासाचा अवधी लागला. अखेर सकाळी ८.१०च्या सुमारास ही गाडी पुढे रवाना झाली. दरम्यान, कल्याण येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एक, कर्जत-भिवपुरी या स्थानकांदरम्यानही रुळाला तडे जाण्याच्या घटना घडल्या. त्यामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला. हे बिघाड दुरुस्त होतात तोच, सकाळी साडेनऊच्या दरम्यान माटुंगा-शीव या स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर रुळाला तडा गेला. त्यामुळे कल्याणकडे जाणारी वाहतूकही खोळंबली.  या सर्व बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी संध्याकाळपर्यंत  उशिराने सुरू होती.

ओव्हरहेड वायरच्या झटक्याने तरुण जखमी

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या गाडीच्या इंजिनावर चढलेल्या एका तरुणाला ओव्हरहेड वायरचा झटका लागला. त्यात तो जबर जखमी झाला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.