मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेने ४६ अतिरिक्त विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – मडगावदरम्यान २० रेल्वे सेवा आणि मुंबई – संतरागाछीदरम्यान २६ रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या २० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०१९ ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी मध्यरात्री १२.५५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे रविवारी दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०२० ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत मडगाव येथून दर रविवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ३.५० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवि आणि करमळी येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय डबे आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस – संतरागाछी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या २६ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१००१ ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी, २१ एप्रिल ते १४ जुलै या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१००२ ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २३ एप्रिल ते १६ जुलै या कालावधीत संतरागाछी येथून दर गुरुवारी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला २ वातानुकूलित द्वितीय डबे, १० वातानुकूलित तृतीय (इकॉनॉमी) डबे, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय डबे आणि २ जनरेटर डबे असतील. गाडी क्रमांक ०१०१९ या विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण १ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर खुले होईल. तर, गाडी क्रमांक ०१००१ या विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर खुले झाले आहे. या सामान्य दरांवर आधारित अनारक्षित डब्यांसाठीचे तिकीट यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. तिकिटांच्या आरक्षणासाठी प्रवासी रेलवन हे ॲपही डाउनलोड करता येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
