मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचारी सतत वाढणारा कामाचा ताण, प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि अपुरी सुरक्षा यामुळे मानसिक व प्रशासकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केला आहे. तिकीट तपासणी कर्मचारी विक्रमी महसूल मिळवून देत असूनही प्रशासनाकडून त्यांच्यावर सतत वाढती उद्दिष्टे लादली जात आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती, लोकल आणि स्थानकांतील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांकडून होणारा दबाव यांचा पुरेसा विचार केला जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

गर्दीच्या लोकलमध्ये आणि संवेदनशील परिस्थितीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) पुरेसे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. विशेषतः आरक्षित डब्यांमध्ये वाढत्या अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे प्रवासी आणि तिकीट तपासणी कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत.

कर्तव्य बजावताना अनेकदा प्रवाशांसोबत वाद, धक्काबुक्की किंवा अनुचित घटना घडतात. काही प्रकरणांमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून खोटे न्यायालयीन खटलेही दाखल केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मात्र अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर मदत किंवा संस्थात्मक पाठिंबा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

  • तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी वाजवी आणि व्यावहारिक उद्दिष्टे निश्चित करावीत.
  • कर्तव्यादरम्यान योग्य सुरक्षा व्यवस्था व आरपीएफचे पूर्ण सहकार्य मिळावे.
  • अधिकृत कर्तव्य करताना खोटे न्यायालयीन खटले दाखल झाल्यास रेल्वे प्रशासनाने संपूर्ण कायदेशीर मदत द्यावी.
  • आरक्षित प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण करावे.

कर्मचाऱ्यांचे कल्याण, प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेचे सुरळीत कामकाज यासाठी प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे. संघटनेचे विभागीय सचिव संजीव कुमार दुबे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच संघटनेच्यावतीने सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक ८ वर तिकीट तपासनीसाच्या समर्थनात आंदोलन केले.

महिला प्रवाशाकडून तिकीट तपासनीसाला धक्काबुक्की

पश्चिम रेल्वेवरील बुधवारी सायंकाळी ७.५१ च्या विरार – चर्चगेट वातानुकूलित लोकलमध्ये अंधेरी – वांद्रेदरम्यान तिकीट तपासनीस चढले आणि त्यांनी काही प्रवाशांकडे तिकीटाची मागणी केली. यावेळी त्यांना ६ प्रवासी सामान्य लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या तिकीटावर वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत असल्याचे आढळले. यावेळी त्यांना दंडाची रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली.

परंतु, ते प्रवासी दंड भरण्यास तयार नव्हते. त्यांनी गोंधळ घातला आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. एका तिकीट तपासनीसाला महिलेने धक्काबुक्कीही केली. लोकल दादर स्थानकावर आल्यानंतर प्रवासी आणि तिकीट तपासणी कर्मचारी लोकलमधून उतरले. त्यांच्याकडून एकूण २,१६० रुपये दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवाशांनी तिकीट तपासनीसांला खटला दाखल करण्याची धमकी दिली, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.