मध्य रेल्वेवरील बुधवारच्या ‘लोकलकोंडी’चा इतिवृत्तान्त

एकीकडे मुंबई ते अहमदाबाद प्रवास बुलेट ट्रेनच्या माध्यमातून दोन तासांत पूर्ण करण्याच्या घोषणा करण्यात येत असताना मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेने दादर ते डोंबिवली हे एक तासाचे अंतर गाठण्यास बुधवारी रात्री तीन तास ३५ मिनिटे घालवली. विक्रोळी येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी सायंकाळपासून रखडलेली मध्य रेल्वेची लोकलसेवा गुरुवार सरेपर्यंत पूर्वपदावर आली नव्हती. परंतु, बुधवारी रात्री झालेल्या ‘लोकलकोंडी’ने प्रवाशांची अक्षरश: दैना उडवली. एकाच जागी थांबलेल्या गाडय़ा, वीज नसल्याने झालेला अंधार आणि बंद असलेले पंखे अशा अवस्थेत प्रवाशांनी रेल्वेला शिव्यांची लाखोली वाहात संपूर्ण प्रवास पार केला.

बुधवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरांत पावसाने किंचित हजेरी लावली. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे उत्साहाने घराकडे निघालेल्या मुंबईकरांची वाट लोकलसेवेने रोखून धरली. रात्री सव्वाआठ-साडेआठच्या सुमारास दादरच्या फलाट क्रमांक एक आणि दोनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. फलाटावर धड उभे राहायलाही जागा नव्हती. धिमी गाडी पकडण्यासाठी पादचारी पुलावरून खाली उतरणाऱ्या प्रवाशांच्या मनात हे दृश्य धडकी भरविणारे होते. गाडय़ांचा काही तरी गोंधळ झाल्याचे तेव्हाच अनेकांच्या लक्षात आले. पण नेमके काय व कशामुळे झाले ते कळण्यास मार्ग नव्हता. मधूनमधून ‘विक्रोळी येथे सिग्नल केबिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे’ अशी उद्घोषणा होत होती. मात्र, त्यापुढे काहीच सांगण्यात येत नव्हते. अशातच ८ वाजून २७ मिनिटांनी दादरहून कल्याणला जाणारी उपनगरी गाडी फलाट क्रमांक एकवरून आठ मिनिटे विलंबाने सुटली. गाडी प्रवाशांनी पूर्णपणे भरली होती. शरीर हलवण्याइतकीही जागा उरली नव्हती. सुरुवातीपासूनच रखडत चाललेली लोकल सव्वानऊच्या सुमारास कुर्ला स्थानकात पोहोचली. त्यानंतर तर तिची गती आणखी मंदावली. गाडी इतक्या हळूहळू का जात आहे, याबाबतची कोणतीही घोषणा ना फलाटांवर होत होती ना गाडीतील स्पीकरवरून होत होती. त्यामुळे प्रवाशांना काय करावे, हेच कळत नव्हते. त्यातच घाटकोपर गेल्यानंतर गाडी जी थांबली ती थांबलीच. गाडीतील वीजपुरवठाही वारंवार खंडित होत होता. त्यामुळे दिवे बंद चालू होत होते, पंखेदेखील बंद होते. अशा उकाडय़ातच प्रवासी आपल्या जागेवर तग धरून उभे होते. आसपासच्या रुळांवरही लोकलगाडय़ा रखडल्याचे चित्र दिसत होते. अनेकांनी घरी फोन करून उशीर होत असल्याची कल्पना दिली. एक तास गाडी एकाच जागी थांबल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम संपला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी झालेली लोकलकोंडी चेष्टेचा व त्र्यागाचा विषय ठरली. ‘हेच का ते अच्छे दिन’, मुंबईकरांवर ‘प्रभू’कृपा कधी होणार, ‘प्रभू’देवा, काही खरे नाही रे, वाचव बाबा’ असे शाब्दिक टोले प्रवाशांतून हाणले जात होते आणि त्याला दादही मिळत होती.

तब्बल सव्वा तासानंतर साडेदहाच्या सुमारास ही गाडी हलली. पण अध्र्या मिनिटाचे अंतरही कापते न तोच ती पुन्हा उभी राहिली. अशाच अवस्थेत रखडत रखडत तिने ११ वाजून पाच मिनिटांनी विक्रोळी गाठले. ११ वाजून २१ मिनिटांनी लोकल भांडुप स्थानकात आली तेव्हा स्थानकातील इंडिकेटरवर गाडी येण्याची वेळ ८.५३ अशी दाखविली जात होती. त्यानंतर पुढे भराभर स्थानके घेत गाडी १२ वाजून पाच मिनिटांनी डोंबिवलीत पोहोचली. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पाणी, गोळय़ावाटप आणि २६ जुलैची आठवण

साडेतीन तासांच्या या प्रवासात डब्यामधील गर्दी जणू एकरूप झाली होती. होणारा उशीर, जाणवणारा उकाडा, त्यामुळे होणारी चिडचिड या सर्वातही प्रवाशांनी माणुसकी जिवंत ठेवली. अशा वेळी कुणी बसलेला प्रवासी स्वत:हून उठून उभ्या प्रवाशाला जागा देत होता. कुणी आपल्याकडील पाणी शेजारच्या प्रवाशाला देत होता. कुणी आपल्याकडच्या खाऊ, गोळय़ाही इतरांसोबत ‘शेअर’ केल्या. संकटसमयी एकमेकांचा हात न सोडणाऱ्या मुंबईकरांना त्या क्षणी ‘२६ जुलै’च्या दिवसाची आठवण आली.