मुंबई : विनातिकीट प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. विनातिकीट प्रवाशांची टक्केवारी वाढत असताना, त्यांना रोखण्यासाठी तिकीट तपासनीस पथक तैनात केले आहे.
मध्य रेल्वेतील २४ तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवाशांना पकडून करोडो रुपयांची दंडवसुली केली आहे. त्यात मध्य रेल्वे मुख्यालयातील १०, भुसावळ विभागातील १०, मुंबई विभागातील ३ आणि पुणे विभागातील एका तिकीट तपासनीसाने एक कोटीपेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल करून, मध्य रेल्वेला वाया जाणारा महसूल प्राप्त करून दिला आहे.
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ३८.०५ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून, २०३.७० कोटी रुपयांची दंडवसुली केली. तर, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४१.८२ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून, २५१.४२ कोटी रुपयांची दंडवसुली केली. त्यामुळे या दोन्ही वर्षाच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील ९.९४ टक्के विनातिकीट प्रवाशांची वाढ झाली.
दंडवसुली करून महसुलात २३.४३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. यात सर्वोत्तम कामगिरी मध्य रेल्वेतील २४ तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांनी केली. भुसावळ विभागातील प्रवासी तिकीट परीक्षक निसार खान यांनी १ कोटी ४८ लाख २७ हजार ८७४ रुपयांची दंडवसुली केली. तर, मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील मुख्य तिकीट निरीक्षक एम.एम. शिंदे यांनी सलग दोन वर्षे एक कोटी रुपये दंडवसुलीचा टप्पा ओलांडला आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ त्यांनी १ कोटी १३ लाख ६८ हजार ३८० रुपयांची दंडवसुली केली होती. तर, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यांनी १ कोटी ४६ लाख ३१ हजार २९० रुपयांची दंडवसुली केली. करोडपतींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक संतोष कुमार गुप्ता हे असून त्यांनी १.१९ कोटी रुपयांची दंडवसुली केली. मुख्यालयातील प्रवासी तिकीट निरीक्षक सुभाष गलांडे यांनी १.०९ कोटी रुपयांची दंडवसुली केली. त्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ८४.१० लाख रुपयांची दंडवसुली केली होती.
मुख्यालयातील प्रवासी तिकीट निरीक्षक दीपक दहातोंडे यांनी १.०६ कोटी रुपये, मंगेश पाठक १.०३ कोटी रुपये, हनुमंत वाघ १.०२ कोटी रुपये, संतोष राऊत १.०१ कोटी रुपये, सुबोध कुमार १.०१ कोटी रुपये, प्रशांत ठाकूर आणि एन. बी. कोलेकर यांनी एक कोटी रुपयांची दंडवसुली केली. तर, मुख्यालयातील मुख्य तिकीट निरीक्षक विनय ओझा यांनी १.०६ कोटी रुपये दंडवसुली केली.
भुसावळ विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक डी. एन. चौधरी १.०४ कोटी रुपये, के. के. पटेल १.०३ कोटी रुपये, डी. के. मीना १.०२ कोटी रुपये, गुड्डू कुमार १.०१ कोटी रुपये, ए. एस. गायकवाड १.०१ कोटी रुपयांची दंडवसुली केली. तसेच भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक पी. के. सिंग १.०२ कोटी, एस. के. दुबे आणि आर. के. गुप्ता यांनी प्रत्येकी १.०१ कोटी रुपयांची दंडवसुली केली.
मुंबई विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक मोहम्मद शम्स यांनी १.०६ कोटी रुपये, मुंबई विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक पी. बी. मेंथे १.०४ कोटी रुपये आणि एस. के. किरकिंडे यांनी १ कोटी रुपयांची दंडवसुली केली. तसेच पुणे विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक एस. एम. धामणे यांनी १.०२ कोटी रुपयांची दंडवसुली केली.
