मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात धडक तिकीट तपासणी मोहीम राबवत ६,७८२ जणांवर कारवाई केली. त्यात फुकट्या प्रवाशांकडून एकूण ३४ लाख ६४ हजार ३०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुख्य मार्ग, हार्बर मार्ग तसेच विविध स्थानकांवर अचानक धाडी, तटबंदी तपासणीसह विशेष मोहिमा राबवण्यात आल्या.
मुंबई उपनगरी रेल्वेगाड्या, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी गाड्या व विशेष रेल्वेगाड्यांमध्ये महसूल गळती रोखण्यासाठी; तसेच प्रवासात शिस्त राखण्यासाठी तिकीट तपासणी पथकांनी व्यापक मोहीम राबवली. मध्य रेल्वेवरील डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, कुर्ला, नेरूळ, पनवेल, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, लोणावळा, भिवंडी व दिवा या स्थानकांवर २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
कसारा व कर्जत-खोपोली दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरील उपनगरी रेल्वेगाड्यांत, स्थानकांत ९८१ विनातिकीट प्रवाशांद्वारे दंडवसुली करून ४.७९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. पनवेल-नेरुळ मार्गावरील सखोल तपासणीत ४५२ प्रवाशांवर कारवाई करून २.१३ लाख रुपये, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या तटबंदी तपासणीत १,३२५ प्रवाशांकडून ५.८१ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
कुर्ला, दादर, भायखळा व दिवा स्थानकांवरील विशेष तटबंदी मोहिमेत ६९६ प्रवाशांकडून ३.२४ लाख रुपये वसूल करण्यात आले. यासह विशेष तपासणीत नेरूळ, दादर व ठाणे येथे १,६८४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून ८.२७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. कोपर, भिवंडी, कल्याण, दिवा व पनवेल परिसरात राबविण्यात आलेल्या ॲम्बुश तपासणीत ९९४ प्रवाशांकडून ४.८६ लाख रुपये दंड आकारण्यात आला. तर, १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान मेल व एक्स्प्रेसमधील विशेष तपासणीत ६५० प्रवाशांवर कारवाई करून ५.५१ लाख रुपये वसूल झाले.
दंडवसुलीसाठी बहुआयामी धोरण
मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले आहे. ज्यात स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), तटबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी व व्यापक तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे. ही कार्यवाही सर्व विभागांत मेल/एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्या तसेच मुंबई विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये केली जाते, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
