मुंबई : मध्य रेल्वेने १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून या काळात तिकिटांची वैधता, सवलतीच्या तिकिटांचा वापर, आरक्षण कोट्यांतील प्रवास व पासच्या गैरवापरावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. एकाच ‘पीएनआर’वर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, प्रवासादरम्यान त्यातील किमान एका प्रवाशाकडे नोंदवलेले मूळ ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. अन्यथा ‘पीएनआर’वरील सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवासी मानून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मध्य रेल्वेने दिला आहे.
या मोहिमेत स्थानके व प्रवासादरम्यान तिकीट तपासणी केली जाणार आहे. सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण हिस्सा व विविध प्रकारच्या पासद्वारे आरक्षित तिकिटांची विशेष छाननी केली जाईल. संबंधित सवलत वा हिश्श्यासाठी पात्रता सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे प्रवाशांकडे आहेत का, याचीही पडताळणी केली जाईल.
ई-पास वा पीटीओवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच प्रवासापूर्वी ई-पास वा पीटीओच्या बदल्यात आवश्यक अधिकृत तिकीट वा पास प्राप्त केल्याची खात्री करावी लागेल. अनारक्षित तिकिटांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचारी आवश्यकतेनुसार ‘टीटीई ॲप’चा वापर करणार आहेत. आरक्षण सुविधांचा गैरवापर, सवलतींचा फसव्या पद्धतीने वापर व रेल्वे महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट, लागू असल्यास मूळ ओळखपत्र व आवश्यक पात्रता कागदपत्रांसह प्रवास करण्याचे तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
