मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांचा विचार करून २६ जानेवारीपासून नवीन वेळापत्रकात १६ फेऱ्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने केला आहे.
मध्य रेल्वेने केलेल्या घोषणेनुसार सध्या कमी अंतरावर सुरू असलेल्या लोकलचा विस्तार करण्यात येणार आहे. यात हार्बर मार्गावरील गाडय़ा बेलापूरऐवजी वडाळा, पनवेल स्थानकांपर्यंत, तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल नेरुळ, बेलापूरऐवजी पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर आठ, ट्रान्स हार्बर मार्गावर सहा, तर मुख्य मार्गावर दोन फेऱ्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या हार्बर मार्गावरील फेऱ्यांची संख्या ५८३ वरून ५९० होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील गाडय़ांची संख्या २१० वरून २३२, तर मध्य रेल्वेवरील एकूण फेऱ्या १६४७ झाल्याचे सांगण्यात आले.