कोकणातल्या घराघरांत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने यंदा ६० विशेष गाडय़ा सोडणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस व दादर येथून मडगाव व सावंतवाडी येथे जाणाऱ्या या गाडय़ा १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. या गाडय़ांच्या आरक्षणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
०१००१ डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव ही गाडी ११ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत गुरुवार सोडून इतर सहा दिवस मुंबईहून मध्यरात्री १२.२० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. ०१००२ अप मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी मडगावहून गुरुवार वगळता आठवडय़ातील सहाही दिवस दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. या दोन्ही गाडय़ांच्या मिळून ३४ फेऱ्या गणेशोत्सवादरम्यान चालवल्या जातील.
०१०३३ डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव ही गाडी १० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दर गुरुवारी मुंबईहून मध्यरात्री १२.२० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर ०१०३४ अप मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी दर गुरुवारी दुपारी ३.२५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. या दोन्ही गाडय़ांमध्ये वातानुकूलित टू टियरचा एक डबा, वातानुकूलित थ्री टियरचे दोन डबे, शयनयान श्रेणीचे ११ डबे आणि दोन साधारण श्रेणीचे डबे असतील.
तर ०१०९५ डाऊन दादर-सावंतवाडी ही गाडी ११ सप्टेंबरपासून आठवडय़ातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी दादरहून सकाळी ७.५० वाजता निघेल. ही गाडी सावंतवाडी येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. तसेच ०१०९६ अप सावंतवाडी-दादर ही गाडी १२ सप्टेंबरपासून दर सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी सावंतवाडीहून पहाटे ४.५० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी ३.५० वाजता दादरला पोहोचेल.
या सर्व गाडय़ा दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबतील.