मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करणार

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मध्य रेल्वेकडूनही खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकावरील पादचारी पुलावर उभे राहून लोकलची वाट पाहण्याच्या प्रवाशांच्या सवयीला लगाम घालण्यासोबतच पुलावरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी ‘मेगाफोन’वरून सूचना देण्यात येत आहेत. मात्र, सोमवारपासून याची अमलबजावणी सुरू होताच पुलावर उभे राहणारे प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये खटके उडत असल्याचे दिसून आले.

२९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या जिन्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली आणि २३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. पाऊस, त्यामुळे पादचारी पुलावर झालेली एकच गर्दी याला कारणीभूत

असल्याचे प्रथम पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे फेरीवाल्यांमुळेही पादचारी पुलावर तसेच प्रवेशद्वाराजवळ गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. हे पाहता रेल्वे सुरक्षा दलाकडून फेरीवाल्यांनाही हटवण्याचे काम करण्यात आले. यानंतर मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून आता गर्दीवर नियंत्रण मिळवतानाच पुलावर  कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुलावरील प्रवाशांना हटकण्याचा तसेच गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी उद्घाोषणा करणारे ‘मेगाफोन’ सुरक्षा दलाच्या जवानांकडे देण्यात आले असून त्याद्वारे पुलावर न थांबण्याचे आवाहनही केले जात आहे.

मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून नियोजन करताना गर्दीनुसार जवानांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण यासह अन्य काही गर्दीच्या स्थानकांवरील पुलावर जवान तैनात करण्यात आले आहेत. सकाळी आणि संध्याकळी गर्दीच्या वेळी जवान तैनात करून गर्दीवर नियंत्रण करतील. गर्दीनुसार प्रत्येक पुलावर दोन ते चार जवान तैनात करताना यात महिला सुरक्षा जवानांही सामील करण्यात आले आहे.

प्रवाशांची नाराजी

पुलावर अनेक प्रवासी हे रेल्वे पुलावर उभे राहून आधी जलद लोकल येते की धिमी लोकल याची वाट पाहत उभे असतात. त्यासाठी पुलावर असणाऱ्या इंडिकेटरकडेही पाहून लोकल पकडण्याचे नियोजन करतात. अशातच पुलावर प्रवाशांना न थांबण्याचे आवाहन करून हटकण्यात येत असल्याने प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दल जवानांमधे खटके उडत आहेत.

गर्दीच्या वेळी पुलावर सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. प्रवाशांची प्रचंड गर्दी पुलावर होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी जवानांकडे मेगाफोन देण्यात आले असून त्यावरून प्रवाशांना सूचना देण्यात येत आहेत.

-सचिन भालोदे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे सुरक्षा दल