गुरुवारीही वेळापत्रक कोलमडलेलेच; ६० हून अधिक सेवा रद्द
मध्य रेल्वेवर झालेल्या बिघाडामुळे बुधवारी किमान साडेतीन-चार तास अडकून थकूनभागून घरी पोहोचलेल्या प्रवाशांना गुरुवारी सकाळीही मध्य रेल्वेच्या दिरंगाईचा फटका बसला. ताजेतवाने होऊन कामाला निघालेल्या प्रवाशांचे स्वागत गुरुवारी सकाळी काही गाडय़ा रद्द होत असल्याच्या आणि गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याच्या उद्घोषणांनी झाले.
मात्र या वेळी कोणतेही तांत्रिक कारण नसून बुधवारच्या सावळ्या गोंधळाच्या परिणामामुळेच गुरुवारी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारचा गोंधळ पावसामुळे नसून विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे झाल्याचेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले.शेवटची, म्हणजे कुर्ला-ठाणे यांदरम्यानची सहावी मार्गिका पहाटे पाचला सुरू झाली. या सर्व गोंधळाचा फटका गुरूवारीही बसला. यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी नेमके काय झाले?
रेल्वेला विविध कंपन्यांकडून पुरवली जाणारी वीज रेल्वेच्या विविध प्रणालींपर्यंत पोहोचवण्याचे काम ऑक्झिलरी ट्रान्स्फॉर्मर हा महत्त्वाचा भाग करतो. विजेचा उच्च दाब गरजेप्रमाणे कमी-जास्त करून तो ती वीज पोहोचवतो. मात्र बुधवारी विक्रोळी स्थानकाजवळ संध्याकाळी ८.०६ वाजता या ट्रान्स्फॉर्मरवर उच्च दाब पडला. त्यामुळे तो तुटला. वास्तविक या ट्रान्स्फॉर्मरचे आयुर्मान २५ वर्षे असूनही हा विशिष्ट ट्रान्स्फॉर्मर दोन वर्षांतच खराब झाला. मात्र त्यामुळे रेल्वेच्या विविध विद्युत यंत्रणांमधील फ्युज जळले आणि त्यामुळे सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. त्याचबरोबर ओव्हरहेड वायरमध्येही नेहमीपेक्षा उच्च दाबाने विद्युतपुरवठा होऊ लागला. अशा परिस्थितीत गाडीचे पेण्टोग्राफ अचानक खाली होतात आणि गाडय़ा जागीच थांबतात. बुधवारी नेमके असेच झाले. हा बिघाड विक्रोळी, दादर, शीव, माहीम, चेंबूर, टिळकनगर अशा अनेक ठिकाणी झाला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व मार्गिका बंद पडल्या. मध्य रेल्वेच्या अभियंत्यांपासून कर्मचाऱ्यांना हा बिघाड शोधून तो दुरुस्त करण्यासाठी पहाटेचे पाच वाजले.

दिरंगाई का?
मध्य रेल्वेवर धावणाऱ्या १२०हून अधिक गाडय़ा दर रात्री विविध ठिकाणच्या कारशेड आणि सायिडगला उभ्या राहतात. त्यानंतर त्या विविध स्थानकांमधून सकाळी मुंबईकडे आणि सीएसटीहून विविध स्थानकांकडे रवाना होतात. बुधवारी सर्वच गाडय़ा दिरंगाईने पोहोचल्याने आणि अनेक गाडय़ा अडकून पडल्याने गाडय़ांचे हे वेळापत्रक कोलमडले होते. त्याचप्रमाणे गाडय़ांबरोबरच मोटरमनही अडकून पडले. तसेच मोटरमनच्या सीएसटी लॉबीत काम करणारे बहुतांश मोटरमन कल्याण येथील रेल्वे वसाहतीत राहतात. त्यांना कामावर येण्यासाठी बुधवारी पाच ते सहा तासांचा अवधी लागला. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सेवांवर परिणाम झाला. यामुळे प्रवासी त्रस्त झाले.

* बुधवारच्या बिघाडामुळे लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचे वेळापत्रक विस्कटल्याने गुरुवारी पहाटेपासून या गाडय़ांना प्राधान्य देण्यात आले होते. लोकलच्या गर्दीची वेळ सुरू झाली, तरी यापैकी बऱ्याच गाडय़ा मुंबई हद्दीतच अडकून पडल्याने उपनगरीय सेवेवर ताण पडला.

मेट्रो रेल्वे-३ च्या कारशेडसाठी नवा पर्याय
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य शासन आता नव्या पर्यायाच्या शोधात आहे. आरे वसाहत ‘पर्यावरण क्षेत्रा’त येत असल्याचे केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आल्याने आता या नव्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. त्या अगोदर मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीच्या जागेचा विचार केला जात होता.
राज्य शासनाकडून आता मेट्रो-३ च्या कारशेडसाठी खासगी जमिनीचा पर्याय समोर आला आहे. ही जागा सुमारे ६६ एकर (२६ हेक्टर) असून त्याची मालकी ‘रॉयल पाल्म्स’कडे आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली तर याचा विचार करण्यात येणार आहे. आरे डेपोपासून ही जागा सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने याबाबतचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे.