मुंबई : मध्य रेल्वेवरून दादर – गोरखपूर रेल्वेगाडी नुकताच कायमस्वरूपी करण्यात आली. आता उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी प्रत्येकी एक रेल्वेगाडी कायमस्वरूपी सुरू करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा आणि दादर – बलिया या दोन नवीन रेल्वेगाड्या नियमित करण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंडळाने देशभरातील अनेक रेल्वेगाड्यांच्या जोड्या नियमित करून गाडी क्रमांकांनी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या लवकरच नियमित रेल्वेगाड्या म्हणून चालवल्या जातील. गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर-दादर विशेष ही गाडी नियमित गाडी क्रमांक ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर-दादर एक्स्प्रेस म्हणून चालवली जाईल.
तर, गाडी क्रमांक ०१०२५/०१०२६ दादर-बलिया-दादर विशेष गाडी नियमित गाडी क्रमांक ११०४३/११०४४ दादर-बलिया-दादर एक्स्प्रेस म्हणून चालवली जाईल. तसेच, गाडी क्रमांक १३३७९/१३३८० दरभंगा ते लोकमान्य टिळक टर्मिनस कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी साप्ताहिक असेल आणि दर बुधवारी चालवण्यात येईल.
पुण्यातून दानापूरला जाणारी रेल्वेगाडी कायमस्वरूपी
गाडी क्रमांक ०१४४९/०१४५० पुणे-दानापूर-पुणे विशेष ही गाडी नियमित गाडी क्रमांक ११४३१/११४३२ पुणे- दानापूर-पुणे एक्सप्रेस म्हणून चालवली जाणार आहे.
मुंबई ते गोवा रेल्वेगाडी जुलै २०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस चालू करण्यात आली. सप्टेंबर २०२४ पासून वांद्रे टर्मिनसवरून मडगावला आठवड्यातून दोनदा धावणारी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. नोव्हेंबर २०२२ मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस वरून मडगावला जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. परंतु गेल्या काही वर्षांत राज्यातंर्गत अनेक रेल्वेगाड्या बंद करण्याची मालिका सुरू आहे.
तर, काही रेल्वेगाड्यांचे मार्ग अंशत: रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्या थेट मुंबईत येत नाहीत. भारतीय रेल्वेच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या राज्यांतर्गत व इंटरसिटी रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत. याउलट उत्तर भारतातील रेल्वेगाड्या थेट मुंबईतील स्थानकातून चालवून, त्यांना नियमित केले जात आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
करोना काळात दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद केली. त्यानंतर २०२० सालच्या शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून ही रेल्वेगाडी दिवा रेल्वे स्थानकातून रत्नागिरीला जाते आणि तेथून रत्नागिरी ते दिव्यापर्यंत धावते.
दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालासोपारा, गुजरात येथे स्थायिक असणाऱ्या कोकणवासियांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक आहे. तसेच, दिव्याला प्रवास करण्यासाठी रेल्वेशिवाय इतर सोयीस्कर पर्याय नसल्याने लांबून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात.
