मुंबई : ‘कॅग’च्या अहवालानंतर मध्य रेल्वेने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई विभागातील तब्बल २,९१३ पाण्याच्या टाक्यांपैकी २,४७९ टाक्यांची स्वच्छता पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत तपासलेल्या ३४९ पाणी नमुन्यांपैकी एकाही नमुन्यात ‘ई-कोलाय’ आढळले नाही. त्यामुळे सध्या प्रवाशांना पुरविले जाणारे पाणी सुरक्षित असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेबाबत ‘कॅग’च्या अहवालानंतर रेल्वे मंडळाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत मुंबई विभागातील २,९१३ पैकी २,४७९ पाण्याच्या टाक्यांची, म्हणजेच ८५ टक्क्यांहून अधिक टाक्यांची स्वच्छता केली. उर्वरित ४३४ टाक्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे.
तपासणीत ४१० टाक्यांमध्ये त्रुटी
– २० ऑगस्ट ते २८ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत स्थानके, फलाट, कार्यालयीन परिसर, तसेच रेल्वे वसाहतींमधील पाण्याच्या यंत्रणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४१० टाक्यांमध्ये त्रुटी आढळल्या. त्यापैकी ४०९ त्रुटींचे निवारण करण्यात आले असून एका टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
– टाक्यांमधील पाणी बाहेरील घटकांमुळे दुषित होऊ नये, यासाठी १७१६ ठिकाणी टाक्यांना घट्ट झाकणे तसेच व्हेंट आणि ओव्हरफ्लोवर जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. याशिवाय गळती किंवा दोषपूर्ण असलेल्या २६ जलवाहिन्यांची दुरुस्तीही पूर्ण करण्यात आली.
– हँडपंप आणि बोअरवेलच्या पाण्याचीही तपासणी करण्यात आली. तपासण्यात आलेले सर्व २९ हँडपंप आणि बोअरवेलचे स्रोत योग्य असल्याचे आढळले. तसेच १३४ ठिकाणी पाण्यातील ‘क्लोरीन फ्री रेसिड्युअल’च्या पातळीची दैनंदिन देखरेख सुरू करण्यात आली आहे.
३४९ नमुन्यांची तपासणी
विशेष मोहिमेदरम्यान पिण्याच्या पाण्याचे ३४९ नमुने तपासण्यात आले. हे सर्व नमुने जीवाणूजन्य चाचणीत सुरक्षित आढळले असून एकाही नमुन्यात ‘ई-कोलाय’ आढळले नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांना पुरविले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित आणि पिण्यायोग्य असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. ‘सीएजी’च्या अहवालानंतर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी यासाठी एकसमान कार्यपद्धती लागू केली आहे. भविष्यातही पाण्याच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
