scorecardresearch

मुंबई: मध्य रेल्वेलाही मिळणार चार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’

‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे.

मुंबई: मध्य रेल्वेलाही मिळणार चार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’
‘वंदे भारत एक्स्प्रेस’( संग्रहित छायचित्र )

‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच चार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशोत्सवात एसटीचा प्रवास खडतर ; एसटी महामंडळ आवश्यक सामग्रीसह दुरुस्ती पथक तैनात करणार

चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांची बांधणी करण्यात येत आहे. सुमारे ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची तेथे बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये १६ वातानुकूलित डबे असणार आहेत. तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे. सध्या नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-कटरा मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे. पश्चिम रेल्वेवरही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या मार्गावर ही गाडी चालवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

हेही वाचा – मुंबई : आरे वसाहतीमध्ये आंदोलन सुरूच

त्याबरोबरच मध्य रेल्वेलाही चार वंदे भारत गाड्या मिळणार आहेत. या गाड्या शयनयान प्रकारातील नसतील. या गाड्यांमध्ये केवळ आसन व्यवस्था असेल. राज्यातील जालना, नाशिक, पुणे या मार्गांवर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ चालवण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रतितास २०० किमी वेगाने धावते. तसेच तुलनेत या एक्स्प्रेसचा खर्चही कमी आहे. भारताबाहेर निर्मिती होणाऱ्या या रेल्वेगाड्यांसाठी जवळपास २९० कोटी रुपये खर्च येतो. मात्र देशात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची निर्मिती ११० ते ११५ कोटी रुपयांमध्ये होत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central railway will also get four vande bharat express mumbai print news amy

ताज्या बातम्या