मुंबई : रेल्वे रुळांलगत आणि स्थानकाबाहेर पसरलेले घाणीचे साम्राज्यात आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र आता मध्य रेल्वेने मुंबई विभागातील रुळांजवळील, तसेच स्थानक परिसरातील मोकळ्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वारस्य निविदा मागवण्यात येत असून त्यासंदर्भात ५ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच रुळालगत आणि स्थानकालगतच्या परिसराला चांगले रुप येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

रेल्वे रुळांजवळील झोपड्यांमधून रुळावर टाकले जाणारे कागद, प्लास्टिक, कचरा आणि अन्य वस्तू, तसेच प्रवाशांकडून केली जाणारी अस्वच्छता यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मध्यरात्री लोकल सेवा बंद होताच रेल्वेच्या विशेष कचरा गाडीमार्फत ठिकठिकाणी साफसफाईही करण्यात येते. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. रेल्वे प्रशासनाने फलाट संपताच रुळांजवळच निरनिराळी झाडे लावून बगीचाही फुलवला आहे. त्याची देखभाल करण्यातही समस्या येतात.

त्यामुळे मध्य रेल्वेने स्थानकातील मोकळ्या जागेचा वापरही सौंदर्यीकरणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक संस्था, विविध खासगी कंपन्याना हे काम देण्यात येणार आहे. या जागांमध्ये बगीचा करता येील किंवा विविध प्रकारची झाडे लावता येतील. या जागेचे सौंदर्यीकरण करणाऱ्यांचे नाव त्याला देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई विभागातील स्थानकात सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 5 जुलैला स्वारस्य निविदा मागवण्यात आली असून 8 जुलैला निविदा खुली करण्यात येणार आहे.

पुढील स्थानकातील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण

सीएसएमटी, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानक, कुर्ला कारशेड, एलटीटी, माटुंगा, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड, ठाणे, दिवा, ठाकुर्ली, कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, खर्डी, कसारा, इगतपुरी, पनवेल, रोहा, पेण, भिवंडी, विठ्ठलवाडी, वांगणी, नेरळ, कर्जत, खंडाळा, लोणावळा.