मुंबई : देशभरात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. रेल्वे स्थानकात स्वस्तात मिळणाऱ्या वडापावचा तर १ जूनपासून ७ रुपयांनी वाढविण्याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले होते. परंतु, प्रवाशांनी विरोध केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले.
मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील स्टॅटिक केटरिंग युनिट्समध्ये विकल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांच्या दरात १ जून २०२६ पासून वाढ सुचविणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. उप मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (दावे व खानपान), सीएसएमटी यांच्या कार्यालयातून २५ मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ‘ए -ला – कार्ट’ पदार्थांच्या दरपत्रकात सुधारणा करण्याचे नमूद केले होते. मुंबई, भुसावळ, सोलापूर, नागपूर, पुणे विभागांतील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना याबाबत सूचना देण्यात आली होती.
नवीन दरांनुसार प्रवाशांना आता फलाटावरील खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार होते. विशेषतः वडापाव, समोसा, सँडविच, डोसा, पावभाजी यासारख्या लोकप्रिय पदार्थांच्या दरात मोठी वाढ करण्याचे नियोजन होते. सध्या १३ रुपयांना मिळणारा वडा पाव २० रुपयांवर पोहोचणार होता. तर, समोशाचा दरही १२ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला होता.
दरम्यान, कचोरी, गुलाबजाम, ताजा ज्यूस, मिसळ पाव, व्हेज नूडल्स यांसह १६ पदार्थांच्या दरात कोणताही बदल न करण्याचे प्रस्तावित होते. तसेच सरबत आणि सोडा उत्पादनांचे दरही ‘जैसे थे’ ठेवण्याचे नियोजन होते. परंतु, प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी या दरपत्रकाला विरोध दर्शविला. त्यानंतर रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ्यांच्या दरात वाढ करण्याचे परिपत्रक मागे घेण्यात आले. १ जूनपासून लागू होणाऱ्या दरपत्रकातील सुधारणा, पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
दरवाढीसोबत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली पाहिजे. सर्व परवानाधारकांनी आपल्या केटरिंग युनिट्समध्ये नवीन दरपत्रक द्विभाषिक स्वरूपात ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करणे. नवीन दर लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी विक्रीचे मूल्यांकन करून परवाना शुल्काचा आढावा घेण्याचे निर्देश विभागांना देण्यात आले होते.
अशी होती सुधारित दरांची यादी
- १. बटाटा वडा (१ नग) – १५ रुपये
- २. रगडा/उसळ प्लेट १ पाव – २५ रुपये
- ३. व्हेज समोसा (१ नग) – २० रुपये
- ४. पाव (१ नग) – ५ रुपये
- ५. व्हेज सँडविच सॉस – ३५ रुपये
- ६. व्हेज चीज सँडविच सॉस – ४५ रुपये
- ७. व्हेज पफ/पॅटिस – २० रुपये
- ८. साबुदाणा वडा – २० रुपये
- ९. ढोकळा – २५ रुपये
- १०. सर्व प्रकारचे लाडू – २० रुपये
- ११. व्हेज फ्रँकी – ३० रुपये.
- १२. व्हेज चीज फ्रँकी – ४५ रुपये
- १३. सुकी भेळ – २५ रुपये
- १४. चटणी भेळ – ३० रुपये
- १५. पोहा नमकीन – २० रुपये
- १६. साधा डोसा चटणी सांभार – २५ रुपये
- १७. मसाला डोसा चटणी सांभार – ३५ रुपये
- १८. कांदा डोसा/उत्तपम – ३० रुपये
- १९. रवा डोसा/मसाला उत्तपम – ३५ रुपये
- २०. रवा इडली (२ नग) – ३५ रुपये
- २१. पावभाजी (२ पाव) – ५० रुपये
- २२. दही वडा (२ नग) – ३५ रुपये
- २३. व्हेज कटलेट (२ नग) – ३५ रुपये
- २४. छोले पुरी – ४० रुपये
- २५. मेदू वडा (२ नग) – ३५ रुपये
- २६. इडली सांबार/चटणी (२ नग) – ३० रुपये
- २७. चणा डाळ वडा – ३५ रुपये
- २८. ब्रेड पकोडा – २५ रुपये
- २९. कांदा पकोडा/मिश्र भजिया – २५ रुपये
- ३०. मूग भजिया – ३० रुपये
- ३१. व्हेज रोल – ३० रुपये
- ३२. व्हेज पिझ्झा – ५० रुपये
- ३३. टोमॅटो सूप – २० रुपये
