मुंबई : मध्य रेल्वेने ‘जागतिक पर्यावरण दिन २०२६’च्या पार्श्वभूमीवर सर्व पाच विभाग आणि कार्यशाळांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शाश्वतता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त उपक्रम आणि हरित जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हजारो अधिकारी, कर्मचारी, प्रवासी आणि नागरिक सहभागी झाले होते.

सर्व विभागांमध्ये नुकताच पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. मुंबई विभागात जनजागृती रॅली आणि वृक्षारोपण करण्यात आले. तर नागपूर विभागात ‘एकल वापराच्या प्लास्टिकला नाही म्हणा’ ही मोहीम राबविण्यात आली. भुसावळ, पुणे आणि सोलापूर विभागातही वृक्षारोपणासह हरित जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली. मनमाड येथील सेंट्रल इंजिनीअरिंग वर्कशॉपमध्ये वृक्षारोपण आणि प्लास्टिक कपातीवर भर देण्यात आला.

प्रवासी आणि कर्मचारी सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. भुसावळ विभागात ‘स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा’ मोहीम राबवण्यात आली, तर सोलापूर विभागात पर्यावरण वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले होते. माटुंगा कार्यशाळेत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये ५०० हून अधिक जण सहभागी झाले होते. या मोहिमेत पुनर्वापर करण्यायोग्य बाटल्या, कापडी पिशव्या आणि कचरा वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली.

स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये संपर्क मोहिमा राबवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह विविध स्थानकांवर पुनर्वापर करण्यायोग्य साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करणारे स्टिकर्स आणि बॅनर्स लावण्यात आले. नागपूर, पुणे, भुसावळ आणि माटुंगा कार्यशाळेत पर्यावरणपूरक सवयी, पाणी व ऊर्जा बचत तसेच प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘स्वच्छ प्लॅटफॉर्म, हरित भविष्य’ या संकल्पनेवर आधारित लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, नाहूर, नाशिक आणि इतर स्थानकांवर सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्या बसवण्यात आल्या. विविध विभागांमध्ये स्वच्छता मोहीम, भंगार वर्गीकरण आणि कचरा व्यवस्थापन उपक्रम राबविण्यात आले.

स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ‘स्वच्छ स्थानके, हरित समुदाय’ अभियान राबविण्यात आले. प्लास्टिकविरहित आणि विघटनशील साहित्य वापराबाबत जनजागृती करण्यात आली. आयआरसीटीसीमार्फत पर्यावरणपूरक खानपान साहित्याला प्रोत्साहन देण्यात आले. नागपूर स्थानकावर बांबूच्या स्टॉलद्वारे पर्यावरणपूरक कटलरीचा प्रचार करण्यात आला. माटुंगा कार्यशाळेत गांडूळ खत प्रकल्पाविषयी जनजागृती करण्यात आली.

‘कचरा व्यवस्थापनात सजग कर्मचारी वर्ग’ या मोहिमेंतर्गत कर्मचारी व रेल्वे वसाहतींमध्ये कचरा वर्गीकरण, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक वापर कमी करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. विविध स्थानकांवर स्वच्छता रॅली आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मध्य रेल्वेने आपल्या कामकाजात शाश्वतता समाविष्ट करून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार केला आहे. प्रवाशांनी पुनर्वापर करण्यायोग्य बाटल्या वापराव्यात, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्थानकांवरील वर्गीकृत कचराकुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेद्वारे करण्यात आले.