मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांची देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : ठाणे – वाशी / नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स – हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी, नेरूळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या, तसेच वाशी, नेरूळ आणि पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवार – रविवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल विरार-वसई रोड ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसेल.