मुंबई : पदविका अभ्यासक्रमाचा निकाल प्रलंबित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान हरकती नोंदविण्यासाठीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून अर्ज निश्चिती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदवी शैक्षणिक संस्थांमधील थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबविण्यात येत आहे. त्यानुसार पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता यावा यासाठी सीईटी कक्षाने २२ आणि २३ जुलैदरम्यान ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे आणि अर्ज निश्चित करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षांचे निकाल अद्यापपर्यंत जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अनेक विद्यार्थी व पालकांनी सीईटी कक्षाला प्रत्यक्ष भेटून, ईमेलद्वारे अर्ज करून मुदत वाढविण्याची मागणी केली होती. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हरकती सादर करण्याच्या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांना नोंदणी करुन अर्ज निश्चिती करण्यासाठी सीईटी कक्षाकडून मुदत देण्यात आली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना हरकती सादर करण्यासाठी अतिरिक्त कालावधी दिला जाणार नसल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांद्वारे संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे व प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करण्यासाठी तसेच हरकती सादर करण्यासाठी कालावधीचा वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. त्यानुसार थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २८ जुलैपर्यंत तर थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशाखा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २९ जुलैपर्यंत सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अर्ज करून प्रवेश निश्चिती करता येणार आहे.