मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येत असलेल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फारच कमी नोंदणी झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी यासाठी सीईटी कक्षाकडून विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांत नोंदणीचा आकडा लक्षणीय असताना कोकण व आदिवासीबहुल भागातील काही जिल्ह्यांत नोंदणी अत्यल्प असल्याचे चित्र आहे.
सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पीसीएम गट, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पीसीबी गट, विधि तीन वर्षे, एमबीए आणि बी.एड या पाच महत्त्वाच्या अभ्यासक्रमांना आतापर्यंत राज्यभरातून १० लाख ७६ हजार ७०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम गटासाठी ४ लाख २७ हजार ६५५, पीसीबी गटासाठी २ लाख ९७ हजार ७८०, एमबीएसाठी १ लाख ४५ हजार २७४, बी.एडसाठी १ लाख १५ हजार २७१ आणि विधि तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी ९० हजार ७२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक १ लाख ११ हजार २७० विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली असून, त्याखालोखाल नाशिक ६६ हजार १०५, अहिल्यानगर ६४ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याउलट राज्यातील सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी म्हणजेच ४ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये ६ हजार ९४१, रत्नागिरीमध्ये ८ हजार २८५, नंदूरबारमध्ये ११ हजार ५४ आणि हिंगोलीमध्ये १२ हजार २१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये कमी नोंदणी होण्यामागे माहितीचा अभाव, डिजिटल प्रक्रियांबाबत असलेला संभ्रम, तसेच मार्गदर्शनाचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे सीईटी कक्षाच्या प्राथमिक आढाव्यातून समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यांतील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून दूर राहू नयेत, यासाठी येत्या काळात सीईटी कक्षाने अशा जिल्ह्यांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात आले असून, त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमांत सीईटी नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अभ्यासक्रमांची माहिती तसेच प्रवेशाच्या टप्प्यांबाबत विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नोंदणीमध्ये मुंबईसुद्धा पिछाडीवर
जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीमध्ये मुंबईचे शहर आणि उपनगर असे दोन जिल्हे ग्राह्य धरले जातात. त्यानुसार मुंबई उपनगरामध्ये ४२ हजार ९०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर शहर जिल्ह्यामध्ये २२ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उपनगरच्या तुलनेत शहरामध्ये फारच कमी नोंद झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये ठाणे, नागपूर, जळगाव, बुलढाणा, कोल्हापूर, अमरावती, सातारा, सांगली, लातूर यापेक्षाही कमी नोंदणी झाली आहे.
सर्वात कमी नोंदणी झालेले पाच जिल्हे
जिल्हा—-पीसीएम—-पीसीबी—-एलएलबी (३ वर्षे)—-एमबीए—-बी.एड—-एकूण
सिंधुदुर्ग—-२,०४८—-१,३४१—-३९९—-४११—२२५—४,४२४
गडचिरोली—-२,१४८—-२,१७१—-२३०—५५२—-१,८४०—-६,९४१
रत्नागिरी—-३,३७८—-२,७१३—६४७—-९४५—-६०२—-८,२८५
नंदुरबार—-३,२२२—–४,२९६—-६७९—-५५३—-२,३०४—-११,०५४
हिंगोली—-३,५२२—-४,८००—-८१०—-६७६—-२,४०८—-१२,२१६
