मुंबई: पुणे जिल्हयातील चाकण व लगतच्या क्षेत्रामध्ये औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांची वाढती संख्या आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन या परिसरासाठी स्वंतत्र स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

चाकण परिसरात पायाभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत तेथील उद्योगांनी स्थलांतराचा इशारा दिल्याच्या पार्श्नभूमिवर फडणवीस यांनी चाकण परिसरासाठी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात औद्योगिक नगरी स्थापन करण्याची घोषणा करुन उद्योगांना मोठा दिलासा दिला आहे. चाकण परिसरातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अशा अनेक प्राधिकरणांच्या अखत्यारित आहेत.

 तथापि, संपूर्ण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्था ही परस्परांशी निगडित असल्याने तिचे विभागनिहाय नियोजन न करता एकात्मिक पध्दतीने नियोजन करण्यासाठी तसेच चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण, वाहतूक व्यवस्थापन, एकात्मिक रस्ता व वाहतूक नियोजन तसेच उद्योगांच्या प्रलंबित प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या समितीला चाकण परिसरातील उद्योगांच्या अडचणी समजून घेऊन त्याचे तातडीने निराकरण करणे तसेच त्या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.

केवळ चाकणच नाही तर पुण्यातील इतरही औद्योगिक वसाहतींमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल टाऊनशिप कायद्यांतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्यात येतील असेही फडणवीस यांनी सांगितले.