मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण बदलांसाठी चला शाळेत जाऊ या, या अभियानाची सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात येईल, अशी घोषणा भुसे यांनी केली.

राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रीत वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावे. नियोजन आणि आढावा बैठकांमधील नियोजनाचे प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसले पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊ या’ हे विशेष अभियान लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती भुसे दिली. या वेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी उपस्थित होते.

शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाजाबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे. राज्यातील आठही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येईल. हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. ज्या शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील, त्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.

शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसर यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. काही कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असली तरी अनेक सुधारणा लोकसहभागातून आणि स्थानिक पातळीवरील पुढाकारातून तातडीने करता येऊ शकतात. शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी समाजाचा सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘आयडॉल बँके’तील अनुभवाचा उपयोग

मागील वर्षापासून उत्कृष्ट काम करणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि चांगल्या कामगिरी करणाऱ्या शाळांची ‘आयडॉल बँक’ तयार करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतर शाळांमध्येही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केला जाणार आहे. एखाद्या शिक्षकाने किंवा शाळेने केलेला यशस्वी प्रयोग व्यापक स्तरावर इतर शाळांमध्ये कसा राबविता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे.