scorecardresearch

तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपपुढे कडवे आव्हान; कोल्हापूरच्या निकालाने पुन्हा सिद्ध; यापूर्वीच्या काही निवडणुकांतही हेच चित्र

पुणे, नागपूर पदवीधरपासून ते कोल्हापूरच्या आजच्या ताज्या निकालावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा निभाव लागणे कठीण जाते हे पुन्हा सिद्ध झाले.

मुंबई : पुणे, नागपूर पदवीधरपासून ते कोल्हापूरच्या आजच्या ताज्या निकालावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा निभाव लागणे कठीण जाते हे पुन्हा सिद्ध झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेतही हे बघायला मिळाली. 

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून तीन पक्ष एकत्र लढल्यास चित्र वेगळे असते, हे प्राकर्षांने जाणवते. पुणे व नागपूर पदवीधर हे भाजपचे पारंपारिक बालेकिल्ले. परंतु शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र लढल्याने या दोन्ही भाजपच्या पारंपारिक मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादीने विजय संपादन केला होता. औरंगाबाद पदवीधरमध्येही हेच चित्र होते. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतही तीन पक्ष एकत्र लढल्याने भाजपच्या पदरी अपयश आले होते.

तीन पक्ष एकत्र लढल्याने मतांचे विभाजन होत नाही. तीन विरुद्ध एक लढताना भाजपला यशाची किनार गाठणे कठीण जाते. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असता तर चित्र नक्कीच बदलले असते. यामुळेच स्थानिक शिवसैनिकांचा आग्रह बाजूला ठेवत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जागा यापूर्वी शिवसेनेने जिंकली असली तरी महाविकास आघाडीतील सूत्रानुसार काँग्रेसच लढवेल आणि सारी ताकद महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी केली होती. याचा काँग्रेसला फायदा झाला.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र लढतात. तीन विरुद्ध एक लढतीत आम्ही चांगली लढत देतो. कोल्हापूरमध्ये आम्ही एकटे लढतानाही काँग्रेसला शेवटपर्यंत फेस आणला होता. या तीन पक्षांनी वेगळे लढून दाखवावे, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजेच भाजपला तिघांशी सामना करताना कठीण जाते ही एक प्रकारे कबुलीच मानली जाते.  करोनाच्या संकटातच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढविल्या नव्हत्या. एकूण १६४९ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक ३८४ जागा भाजपला मिळाल्या होत्या. परंतु स्वतंत्रपणे लढलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला ९०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. यावरून तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी राज्याचा कौल हा महाविकास आघाडीला होता याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

‘भाजपवर निश्चितच परिणाम’

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित लढविल्यास त्याचा भाजपवर निश्चितच परिणाम होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, पदवीधरपासून ते विधानसभा पोटनिवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कल बघितल्यास तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास चित्र वेगळे असते हे स्पष्टच दिसते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Challenge bjp three parties fight together kolhapur verdict proves prevailed previous elections ysh

ताज्या बातम्या