मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजयी झालेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय दीना-पाटील यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. तसे करून त्यांनी संबंधित नियमाचे उल्लंघन केले असून त्याच कारणास्तव त्यांना अपात्र ठरवण्याची आणि त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने या निवडणूक याचिकेची दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. टॅक्सी चालक असलेले आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार शहाजी थोरात यांनी निवडणूक याचिकेद्वारे पाटील यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचे नाव नमूद करणे अनिवार्य आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईचे नाव नमूद केले नव्हते. नियमानुसार, या कारणास्तव पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरतो. त्यामुळे, त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा २९,८०० मतांच्या फरकाने पराभव केला होता.

हेही वाचा – डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती

हेही वाचा – मुंबई : जाहिरात फलकांचीही झाडाझडती, १४ हजारांहून अधिक जाहिरात फलक हटवले

यापूर्वी नारायण राणे, रविंद्र वायकर, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, निलेश लंके यांच्या खासदारकीला विविध मुद्द्यांवर आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांची सुनावणी प्रलंबित आहे.