दळण आणि ‘वळण’ : आव्हानांचा ट्रान्स हार्बर..

ट्रान्स हार्बर मार्गावर २००४मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली.

trans harbour
ट्रान्स हार्बर मार्गावर २००४मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाढती कॉर्पोरेट कार्यालये, तुर्भे, ऐरोली, कोपरखैरणे परिसरात वाढणारी लोकवस्ती, वाशी किंवा पनवेलपर्यंत जाण्यासाठी ठाण्याहून सोयीचा मार्ग अशा अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येला पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का?

दशकभरापूर्वी किंवा नव्वदीच्या दशकात नवी मुंबई परिसरात नेरुळ, सीबीडी बेलापूर, वाशी, सानपाडा अशी नवीन उपनगरे उदयाला आली. मुंबईहून जुन्या वाशी रस्त्याने किंवा हार्बर मार्गाने जोडल्या गेलेल्या या नवी मुंबई शहरात बांधकाम व्यवसायाची भरभराट सुरू झाली. याच वेळी ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल या नव्या रेल्वेमार्गाचे कामही जोरात सुरू होते. त्याचबरोबर ठाणे-बेलापूर हा रस्ताही कात टाकत होता. या रस्त्यावरील एकापेक्षा एक मोठय़ा कंपन्या बंद पडत चालल्या होत्या. त्या कंपन्यांच्या जागांवर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये थाटण्यात येणार असल्याचा सुगावाही त्या वेळी कोणाला लागला नव्हता.

याच दरम्यान ठाणे-वाशी या मार्गावरील विविध स्थानकांच्या आसपास अनेक इमारती उभ्या राहू लागल्या होत्या. कोपरखैरणे आणि ऐरोली या दोन प्रमुख स्थानकांचा यात समावेश होता. रबाळे, घणसोली आणि तुर्भे ही दोन्ही स्थानके रहिवाशांपेक्षाही औद्योगिक क्षेत्रासाठी अधिक प्रसिद्ध होती. १९९३पासून या ट्रान्स हार्बर मार्गावर मालगाडय़ांची वाहतूक सुरू होती. प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच या मार्गावर लोकल गाडय़ा धावणार असल्याची चर्चाही १९९३पासून म्हणजेच पहिली मालगाडी धावली, तेव्हापासूनच सुरू झाली होती. प्रत्यक्षात ही गाडी धावण्यासाठी २००४ हे साल उजाडावे लागले!

ट्रान्स हार्बर मार्गावर २००४मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली. २००४ पर्यंत ठाणे-बेलापूर मार्गावर कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांची सुरुवात झाली नव्हती, पण ही लोकल गाडी सुरू झाली आणि या रस्त्याचीही भरभराट व्हायला लागली. हा इतिहास तसा सर्वश्रुत आहे. त्यात नवीन काहीच नाही.

नवीन हे की, गेल्या तीन वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे आणि ऐरोली या स्थानकांवरील प्रवासी संख्या लक्षात घेतल्यास या संख्येत तब्बल दहा हजारांहून जास्त वाढ झाली आहे. ही वाढ दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे. विशेष म्हणजे या स्थानकांमध्ये ठाणे, वाशी आणि सानपाडा या मध्य व हार्बर मार्गाशी जोडलेल्या स्थानकांमधील ट्रान्स हार्बरच्या प्रवासी संख्येचा भार पेलणाऱ्या स्थानकांचा समावेश नाही. या स्थानकांमधील वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेतल्यास ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या गेल्या तीन वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे.

वरील पाच स्थानकांमध्ये २०१४-१५ या वर्षांत सरासरी १.५६ लाख प्रवासी दर दिवशी प्रवास करत होते. २०१६-१७ या वर्षांत यात दहा लाखांची भर पडून ही संख्या १.६६ लाख एवढी झाली आहे. ठाणे स्थानकात गेल्या तीन वर्षांत सरासरी १५६०० दैनंदिन प्रवासी वाढले आहेत. वाशी स्थानकात हाच आकडा सरासरी दोन हजार एवढा आहे. त्याशिवाय नेरुळ, बेलापूर, पनवेल येथील प्रवासीही ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करतात. म्हणजेच गेल्या तीन वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्येत अंदाजे २० ते २२ हजारांची वाढ झाली आहे.

या तीन वर्षांमध्ये मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्येही लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या वर्षी या फेऱ्यांमध्ये २२ फेऱ्यांची भर मध्य रेल्वेने टाकली होती. तसेच त्याआधी २०१३पासून ट्रान्स हार्बरवर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यास सुरुवात झाली. २०१५मध्ये या मार्गावरील सर्वच्या सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवासी वहन क्षमतेत ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

या सर्व गोष्टी अगदी खऱ्या असल्या, तरी भविष्यात ट्रान्स हार्बर मार्ग मध्य रेल्वेसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. या मार्गावर दोनच मार्गिका असल्याने या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. एमयूटीपी-३ या योजनेत कळवा ते ऐरोली उन्नत जोडमार्ग प्रस्तावित आहे. हा जोडमार्ग तयार झाल्यावर कल्याणवरून वाशीसाठी थेट लोकल चालवल्या जाऊ शकतात. हा प्रकल्प पूर्ण होण्यास किमान तीन वर्षे लागतील असे गृहीत धरूनही या तीन वर्षांमध्ये सध्या असलेल्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्याही त्याच पटीत वाढणार आहे.

कल्याणवरून वाशीसाठी लोकल चालवणे शक्य झाल्यावर या मार्गावरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढेल. सध्या या मार्गावर २५० पेक्षा जास्त सेवा चालवल्या जातात. या सेवा चालवण्यासाठी एकच अप आणि एकच डाउन मार्ग उपलब्ध असल्याने अपघाताच्या किंवा बिघाडाच्या वेळी या मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद होतात. मध्य रेल्वेने गेल्या आठवडय़ातच या मार्गावरील रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतले होते. त्या वेळी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. परिणामी प्रवाशांना रिक्षा, बस आदींचा आधार घेत ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवास करावा लागला होता. हा प्रवास किती डोकेदुखीचा आहे, याचा अनुभव सर्वानाच वेळोवेळी आला आहे.

यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आतापासूनच भविष्यातील आव्हानांचा विचार करून या मार्गावर आणखी दोन किंवा निदान एक मार्गिका टाकण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मार्गाच्या आजूबाजूला आतापासूनच झालेल्या बांधकामांचा विचार करता रेल्वेने आत्ताच या दृष्टीने पावले टाकली नाहीत, तर भविष्यात येथे विस्तार करण्यास वाव नाही. त्याचप्रमाणे सानपाडा येथील कारशेड भविष्यात अपुरे पडणार असून ट्रान्स हार्बर मार्गावरील गाडय़ांसाठी कोपरखैरणे किंवा ऐरोली अशा स्थानकांजवळ एका कारशेडची उभारणी करावी लागणार आहे. या मार्गावरील स्थानकांची रचना चार मार्गिकांचा विचार करूनच केली आहे. त्यामुळे या चार मार्गिका टाकल्यानंतर स्थानकांमध्ये फेरफार करावा लागणार नाही. त्यामुळे भविष्यातील आव्हानांचा विचार करून मध्य रेल्वेने आतापासूनच ट्रान्स हार्बर मार्गाकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

रोहन टिल्लू @rohantillu

tohan.tillu@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Challenges face by trans harbour train

ताज्या बातम्या