विधानसभा अध्यक्षपदासह दोन पोटनिवडणुकांमध्ये आव्हान

मुंबई  : विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेसला आता राज्यात दोन पोटनिवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय विधानसभेचे अध्यक्षपद कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहेच. अध्यक्षपदावरून मित्र पक्षांनी आधीच तंगविले असताना पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेसची सारी भिस्त ही शिवसेना व राष्ट्रवादीवर असेल. 

 नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या एप्रिलमध्ये करोनामुळे निधन झाले. या मतदारसंघात दिवाळीनंतर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनाने राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी सध्या पोटनिवडणुकीची प्रक्रि या सुरू आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. याशिवाय भाजप उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खुल्या मतदान पद्धतीमुळे राज्यसभा पोटनिवडणुकीत मतदान झालेच तरीही काँग्रेसला काही धोका दिसत नाही.

नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी अद्याप निवडणूक घेण्यात आलेली नाही. पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसने करूनही शिवसेना व राष्ट्रवादीने दाद दिली नव्हती. अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान पद्धत असल्याने मतांचा फाटाफू ट होण्याची सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. यातूनच विधानसभा नियमात बदल करून अध्यक्षपदाची निवडणूक ही खुल्या मतदान पद्धतीने घेण्याबाबत विचार सुरू आहे. पटोले यांनी मित्र पक्षांना विश्वासात न घेता राजीनामा दिल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला ते पसंत पडलेले नाही. काँग्रेसमुळे नाहक निवडणुकीला सामोरे जावे लागल्याचे शिवसेना व राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मित्र पक्षांची मदत लागेल. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रातील पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयाबाबत आशावादी आहे.

ज्या पक्षाची जागा रिक्त होईल त्या पक्षाला मित्र पक्षांनी मदत करायची हे महाविकास आघाडीतील धोरण आहे. यामुळे काँग्रेसला मित्र पक्ष मदत करतील.

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष