मुंबई : देशातील सुमारे २० लाख भटक्या प्राण्यांना पशुवैद्यकीय सेवा, निवारा, आहार पुरविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि प्राणी कल्याणासाठी कार्यरत अनंत अंबानी यांनी ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली. अंबानी यांच्या ‘वनतारा’च्या माध्यमातून या उपक्रमांतर्गत देशभरातील ५० हून अधिक प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांना अधिक सक्षम करण्यात येणार आहे.

भटके श्वान, मांजर तसेच मोठ्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्या देशातील ५० संस्थांना एकत्र आणणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ या उपक्रमाची घोषणा जागतिक प्राणी दिनानिमित्त करण्यात आली. प्रत्येक प्राण्यांचे संरक्षण, सन्मानाबरोबरच त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, या विचारातून ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ची संकल्पना पुढे आली आहे. रस्त्यांवर राहणारे श्वान आणि मांजर, तसेच सोडून दिलेले किंवा विविध कामांसाठी वापरली जाणारी गुरे, गाढव आणि घोडे यांच्यासह जखमी, दुर्लक्षित किंवा सोडून दिलेल्या प्राण्यांना या उपक्रमातून मदत केली जाणार आहे. अनेक प्राण्यांना पशुवैद्यकीय उपचार, निवारा, पोषण आणि दीर्घकालीन काळजीची आवश्यकता असते. त्याचबरोबर भटके श्वान आणि मांजरांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी प्राणी जन्मनियंत्रण कार्यक्रमांचीही आवश्यकता असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले आहे.

वनतारा येथे आयोजित दोन दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ५० हून अधिक संस्थांसह देशातील प्राणी कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी वैधानिक सल्लागार संस्थेचा दर्जा असलेल्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे आठ सदस्य उपस्थित होते. ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’अंतर्गत सहभागी संस्थांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार विविध प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, प्राण्यांसाठी निवारा, रुग्णवाहिका आणि फिरत्या सेवा, बचावासाठी आवश्यक उपकरणे, निदान व उपचार उपकरणे, प्रशिक्षण आणि क्षमता विकास तसेच दीर्घकालीन देखभालीच्या सुविधांचा समावेश आहे. वनतारा आणि सहभागी सर्व प्राणी कल्याण संस्थांमध्ये सामंजस्य कराराच्या पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.