लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : यंदा मोसमी वारे दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. मोसमी वारे मुंबईत दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबईत सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. शहर तसेच उपनगरांतील अनेक भागात पाणी साचल्याच्या, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पण मागील दोन दिवस पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी असेल. मुंबईत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पावसात खंड पडल्यामुळे पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३२.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दोन्ही केंद्रावरील तापमान अनुक्रमे २ अंशांनी अधिक नोंदले गेले.

आणखी वाचा-स्वरयंत्राचा पक्षाघात झालेल्या नवजात बलकावर यशस्वीरित्या उपचार, वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले जीवदान

मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज असला तरी राज्यातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, यंदा मोसमी वाऱ्यांचा प्रवास अधिक वेगाने होत आहे. मोसमी वारे सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस अगोदर राज्यात दाखल झाले आहेत. मोसमी वाऱ्यांची उर्वरित भागातील वाटचाल मात्र कायम आहे.