मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा पाऊस पडत असून रविवारी देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवसभर हवामान ढगाळ राहणार असून शहर व उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दरम्यान, मुंबई व उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस पडत असून पश्चिम उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. रेल्वे आणि बेस्ट बसची वाहतूक सुरळीत आहे.गणेशोत्सवादरम्यान मुंबईत पुन्हा एकदा पाऊस कोसळायला सुरुवात झाली.

हेही वाचा : मराठवाडा मुक्ती संग्राम अभ्यासक्रमात घ्या – राज ठाकरे

गेले काही दिवस सलग पाऊस पडतो आहे. शनिवारी दिवसभर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पश्चिम उपनगरात पडला असून ६४ मिमी पावसाची नोंद झाली, तर शहर भागात २९.८२ मिमी, पूर्व उपनगरात ५१.२८ मिमी पाऊस पडला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून त्यावेळी समुद्रात २.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.