अरबी समुद्रात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा येत्या बारा तासांमध्ये अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याची गती आणि दिशा ही उत्तर दिशेला असेल त्यामुळे ३ जून रोजी हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागात सरकेल. यामुळे मुंबई, ठाण्यासह पश्चिम किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागानं सोमवारी व्यक्त केली.

हे चक्रीवादळ जेव्हा उत्तरेकडे सरकेल तेव्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ जून पासून ते जेव्हा उत्तर कोकणाच्या जवळ असेल तेव्हा ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, ३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई केंद्रावरुन देण्यात आली. रायगड आणि दमणदरम्यानचा २६० किमी टप्पा देशातील सर्वाधिक लोकसंख्येपैकी एक आहे. यामध्ये मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या भागांचा समावेश होतो.

आयएमडी दिल्लीचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “या चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम होणार आहे. जेव्हा हे चक्रीवादळ ३ जूनच्या संध्याकाळी किनारी भाग ओलांडेल तेव्हा त्याचा वेग ताशी १०५-११० किमी इतका असेल. त्यामुळे दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.”