मुंबई : देशातील पुरुषांमध्ये पौरुषग्रंथी (प्रोस्टेट), लिंग (पिनाईल) आणि अंडकोष (टेस्टिक्युलर) या तीन कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकारच्या कर्करोगाचे वेळेत निदान करणे, त्याला प्रतिबंध करणे आणि योग्य उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयाने ‘मेनकॅन’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तिन्ही कर्करोगाबाबत तपासणी, सार्वजनिक शिक्षण आणि संशोधनावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्करोगाबाबत अनभिज्ञ असलेले नागरिक किंवा वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करणाऱ्या अनेक पुरुषांना याचा लाभ होणार आहे.

भारतामध्ये मागील काही वर्षांपासून पुरुषांमधील पौरुषग्रंथी कर्करोग, लिंग कर्करोग आणि अंडकोष कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पौरुषग्रंथी कर्करोग हा प्रामुख्याने ५० ते ६४ वयोगटातील पुरुषांना होतो. टाटा रुग्णालयामध्ये २०२४ मध्ये ११ हजार रुग्णांची नोंद झाली होती. तर या वर्षांमध्ये भारतात जवळपास ४१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. टाटा रुग्णालयामध्ये २०२४ मध्ये नोंद झालेल्या रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण हे प्रगत टप्प्यातील आहेत. या टप्प्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ५० ते ६० टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे देशात लिंग कर्करोगाच्या १० ते ११ हजार रुग्णांची २०२४ मध्ये नोंद झाली असून, टाटा रुग्णालयामध्ये गतवर्षी २५० ते ३०० रुग्णांची नोंद झाली आहे.

हा कर्करोग लिंगाशी संबंधित असल्याने व समाजाकडून कशी वागणूक मिळेल या भीतीपोटी पुरुष याबाबत पुढे येत नाही. त्यामुळे टाटा रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांपैकी २० ते ३० टक्के रुग्ण हे पहिल्या टप्प्यातील असून, ४० टक्के रुग्ण हे दुसऱ्या टप्प्यातील आहेत. तसेच साधारणपणे १४ ते ४४ या वयोगटात होणारा अंडकोष कर्करोग हा दुर्मिळ प्रकारातील कर्करोग असला तरी टाटा रुग्णालयामध्ये २०२४ मध्ये साधारणपणे ३०० च्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मुंबई, दिल्ली, बंगळूरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हा कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे युरोऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. गगन प्रकाश यांनी दिली.

कर्करोगाबाबत पुरुषंमध्ये असलेली अनभिज्ञता, समाजाच्या भीतीने वैद्यकीय मदत घेण्यास पुरुषांना होणारा संकोच यामुळे या तिन्ही कर्करोगांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुरुषांमध्ये या वाढत्या कर्करोगाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी टाटा रुग्णालयाने लवकर तपासणी, सार्वजनिक शिक्षण व संशोधन यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाकडून ‘मेनकॅन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत या कर्करोगाची सामान्य लक्षणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, लवकर निदान, योग्य टप्प्यावर निदान करून त्याबाबत उपचार करण्याबाबत पुरुषांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गगन प्रकाश यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायक शानची ब्रॅंड अम्बेसिडरपदी नियुक्ती

पुरुषांमध्ये वाढणाऱ्या पौरुषग्रंथी, लिंग आणि अंडकोष या तीन कर्करोगांबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी टाटा रुग्णालयाने गायक शान याची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. गायक शान याने यावेळी योग्य निदान, लवकर निदान आणि समाजाची भीती न बाळगता याचा सामना करण्याचे आवाहन केले.