मुंबई : गुजरातमधील चांदीपुरा विषाणू (Chandipura Virus – CHPV) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तात्काळ आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. विशेषतः बालकांमध्ये संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवावी, सर्व महापालिका रुग्णालये आणि बालरोग विभागांना आवश्यक औषधे, उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तसेच संशयित रुग्णांच्या निदान आणि उपचारासाठी कृती आराखडा तयार करून स्वतंत्र कार्यपद्धती लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महापालिका मुख्यालयात गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर विविध सूचना मांडल्या. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. माशी, डास आणि इतर रोगवाहक कीटकांच्या नियंत्रणासाठी विशेष स्वच्छता मोहीम, कीटकनाशक फवारणी, संवेदनशील भागांचे सर्वेक्षण, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणी, तसेच सर्व विभागांमध्ये समन्वय साधून तातडीने विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणी पेडणेकर यांनी केली. शहरभर आरोग्य सतर्कता जारी करून रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा आणि बालरोग विभागांना चांदीपुरा विषाणूविषयी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

विशेष आरोग्य सर्वेक्षण राबवा

– पावसाळ्यात साचलेला कचरा, ओलसर वातावरण आणि कीटकांची वाढ यामुळे चांदीपुरा विषाणूसह डेंग्यू, हिवताव, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टरायटिस, टायफॉईड आणि कॉलरासारख्या रोगांचा धोका वाढू शकतो.

– सर्व २६ विभाग कार्यालयांच्या हद्दीत दररोज विशेष स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण आणि कीटकनाशक फवारणी करावी, तसेच शाळा, अंगणवाड्या, रुग्णालये, बाजारपेठा, झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये विशेष आरोग्य सर्वेक्षण राबवावे, अशाही सूचना पेडणेकर यांनी केल्या. – मुंबईसारख्या महानगरात सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणताही धोका दुर्लक्षित करणे परवडणारे नाही. गुजरातमधील परिस्थिती आणि मुंबईतील संभाव्य कचराकोंडीचा एकत्रित विचार करून तत्काळ, समन्वित आणि कायदेशीर चौकटीत कारवाई करावी, असे पेडणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.