मुंबई : गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा विषाणूचा (CHPV) उद्रेक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची यंत्रणा सावध झाली आहे. मात्र सद्यस्थितीत मुंबईत चांदीपुरा विषाणू बाधित एकही रुग्ण आढळलेला नाही, असे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

चांदीपुरा विषाणूचा भारतातील हा पहिलाच उद्रेक नाही. यापूर्वी २००३–०४ मध्ये महाराष्ट्र, गुजरात व आंध्र प्रदेशासह भारतातील काही अन्य भागात या विषाणूचा उद्रेक झाला होता. सध्या गुजरातमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला असला तरी केंद्र आणि राज्य शासनामार्फत सदर बाबतीत मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र तरीही पालिका प्रशासनाने याबाबत पूर्वतयारीचा आढावा घेतला.

याकरीता विलगीकरण सुविधेची तयारी आहे. संभाव्य रुग्ण व्यवस्थापनासाठी कस्तुरबा रुग्णालय येथे १० खाटांचा समर्पित विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा विभाग, राज्य शासन आणि केंद्र शासन, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), नवी दिल्ली यांच्याशी समन्वय साधल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालये व प्रयोगशाळा यांच्याशी समन्वय साधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चांदीपुरा विषाणूचा (CHPV) प्रसार आणि लक्षणे

चांदीपुरा विषाणू (CHPV) हा रॅब्डोव्हिरिडे (Rhabdoviridae) कुळातील व्हेसिक्यलोव्हायरस (Vesiculovirus) वंशातील विषाणू असून मेंदूचा संसर्ग (Encephalitis) निर्माण करतो. हा विषाणू १९६५ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांदीपुरा गावात प्रथम आढळला होता. या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने मादी सँडफ्लाय (Phlebotomine Sandfly) अर्थात विशिष्ट प्रकारच्या माशीमुळे होतो.

लक्षणे अचानक तीव्र ताप उलट्या मानसिक स्थितीत बदल / गुंगी आकडी जुलाब बोलण्यात अडचण, तोल जाणे, झटके येणे यांसारखी मज्जासंस्थेची लक्षणे डोकेदुखी, मान आखडणे व प्रकाशाची संवेदनशीलता, चांदीपुरा विषाणू जोखीम गट, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय जोखीम गट प्रामुख्याने १५ वर्षांखालील ग्रामीण भागातील बालके बाधित होतात. आजाराची प्रगती अतिशय जलद होऊ शकते व अनेक मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत होऊ शकतात.

उपचार

सध्या विशिष्ट अँटीव्हायरल औषध किंवा लस उपलब्ध नाही. लवकर निदान व तातडीचे उपचार अत्यावश्यक आहेत. आवश्यकतेनुसार ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, द्रव व इलेक्ट्रोलाइट संतुलन, आकडी व मेंदूवरील दाबाचे नियंत्रण तसेच दुय्यम जिवाणू संसर्गाचे व्यवस्थापन केले जाते.

प्रतिबंधात्मक उपाय

सँडफ्लाय नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी. परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट व उघड्यावर साचलेले पाणी टाळणे. भेगाळलेली भिंत, जनावरांचे गोठे, अंधाऱ्या खोल्या इत्यादी सँडफ्लायच्या प्रजननस्थळांचे निर्मूलन. पूर्ण बाह्यांचे कपडे, कीटकप्रतिबंधक द्रव्ये व मच्छरदाणीचा वापर.