राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसेचे पठण करणार यावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं होत. यावेळी अनेक शिवसैनिक मातोश्री बाहेर ठाण मांडून बसलेले. त्यापैकी सर्वात चर्चेत होत्या त्या म्हणजे ८० वर्षीय चंद्रभागा शिंदे. पुष्पा स्टाईलने राणा दाम्पत्याला आव्हान देणाऱ्या ८० वर्षीय आजींची मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब भेट घेतली. यामुळे आजी चर्चेत आल्या.

कोण आहेत या आजी?

आजींचे संपूर्ण नाव चंद्रभागा गणपत शिंदे. आजीचा जन्म १५ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. आजींचं शिक्षण झालेलं नाही. त्यांना एकूण ३ मुलं आणि ३ मुली, त्यापैकी एका मुलांचं आणि मुलीचं निधन झालं. आजी आता परळ येथे मोठ्या सुनेसोबत भाड्याच्या खोलीत राहतात. तर दोन मुलं बाजूला राहतात. आजी सुरुवातीपासूनच शिवसेनेत सक्रिय आहेत. त्या ६ वर्षापासून परळ येथील शाखा क्रमांक २०२ च्या उपशाखाप्रमुख आहेत. अनेक पद येत होती परंतु शिक्षण काहीच नसल्याने त्यांनी पदांना नकार दिल्याचं आजी सांगतात. मुंबईत कुठेही आंदोलन असो, मी घरच्यांना न कळवता सहभागी व्हायची, असं आजी सांगतात. बाळासाहेबांच्या वेळेस देखील अनेक वेळा रस्त्यावर उतरले असल्याचे आजीने सांगितले. आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ४ पोलीस केस देखील होत्या. त्यांचं सेनेतील काम पाहून शिवसेना नेते वामनराव महाडिक यांनी केईम रुग्णालयात आया म्हणून नोकरी दिली होती, परंतु महाडीकांकडे विनंती करून आपल्या भावाला नोकरी द्या, असं म्हटल्या आणि त्यांच्या भावाला नोकरीला लावले.

दरम्यान, आजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी आजींची घरी येऊन भेट घेतली आहे. आजी मातोश्रीवर आंदोलनात गेली, हे आम्हाला माहीत देखील नव्हतं. जेव्हा टीव्हीवर बघितलं तेव्हा आम्हाला कळलं की आजी आंदोलनाला गेलीये, असं त्यांची मोठी सून दीपाली शिंदे सांगतात.