मुंबई : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्राची मोठी घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा वा महाविद्यालयाचा समावेश नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर राज्य शासनाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.
‘यंदा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) मध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरला आहे. यामुळे आता राज्यस्तरावरही शिक्षण संस्थांची क्रमवारी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या क्रमवारीतून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. याचसोबत सदर राज्यस्तरीय शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये चुरस लागेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय संस्थात्मक क्रमवारीसाठी (एसआयआरएफ) लवकरच उच्च व तंत्र शिक्षण खात्यांतर्गत एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती सदर राज्यस्तरीय संस्थात्मक क्रमवारीचे निकष काय असतील आणि कोणत्या श्रेणींचा समावेश असेल याबाबत चर्चा करून निर्णय घेईल. तसेच राज्यस्तरीय संस्थात्मक क्रमवारीचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर असेल.

हेही वाचा >>>बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न 

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) ही सर्वसाधारण, विद्यापीठे, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, महाविद्यालय, औषधशास्त्र, वैद्यकीय, वास्तुशास्त्र आणि नियोजन, विधी, दंतशास्त्र, संशोधन संस्था, कृषी आणि संलग्न क्षेत्रे या श्रेणींमध्ये जाहीर करण्यात येते. एनआयआरएफच्या सर्वसाधारण क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘आयआयटी मद्रास’ने गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी आयआयएससी बंगळुरू आहे, तर आयआयटी मुंबईला मागे टाकत तिसऱ्या स्थानी ‘आयआयटी दिल्ली’ ने बाजी मारली आहे. यंदा ‘आयआयटी मुंबई’ने सर्वसाधारण श्रेणीमध्ये चौथे, अभियांत्रिकीमध्ये तिसरे, व्यवस्थापनामध्ये दहावे, संशोधन संस्थांमध्ये चौथे स्थान पटकावून एनआयआरएफ क्रमवारीत स्वतःचा दबदबा कायम ठेवला आहे. तर गतवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील होमी भाभा राष्ट्रीय संस्था विद्यापीठ श्रेणीमध्ये १७ व्या स्थानी आहे.

हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच या श्रेणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची १२ व्या स्थानावरून १९ व्या स्थानी घसरण झाली आहे, तर रसायन तंत्रज्ञान संस्था १४ व्या स्थानावरून २३ व्या स्थानी पोहोचली आहे. सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ ३२ व्या स्थानी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ४६ व्या आणि भारती विद्यापीठ ९१ व्या स्थानी आहे. मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ४७ व्या स्थानी आहे. मुंबई विद्यापीठ ५६ व्या आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ९८ व्या स्थानी आहे. महाविद्यालय श्रेणीमध्ये राज्यातील केवळ दोनच महाविद्यालये असून मुंबईतील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय ५७ व्या स्थानी आणि पुण्यातील फर्ग्युसन स्वायत्त महाविदयालय ७९ व्या स्थानी आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil announcement to announce the state level institutional ranking on the lines of nirf amy
First published on: 09-06-2023 at 17:28 IST