मुंबई: राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली.

महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ अधिनियमावरील चर्चेदरम्यान सदस्य बच्चू कडू यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा सभागृहात मांडली. यापूर्वीही त्यांनी ही मागणी केली होती, त्या अनुषंगाने प्रारूप तयार करण्यात आले असले तरी हा विषय अद्याप प्रलंबित असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठाचा विषय शासनाच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्या निर्णयाला वेळ लागू शकतो. त्यामुळे तत्पूर्वी राज्यातील प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा, अभ्यास साहित्य, समुपदेशन, परीक्षा व्यवस्थापन, तांत्रिक सहाय्य तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना अधिक सुलभ आणि समावेशक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक शासन निर्णय लवकरात लवकर काढण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन पाटील यांनी सभागृहात दिले. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांबाबत राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे.