मुख्यमंत्र्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा ; चंद्रकांत पाटील यांची मागणी

अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करोनाच्या प्रश्नी गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री दृकश्राव्य माध्यमातूनही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन-अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

राज्यात करोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबै बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपद मिळविले, पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा पडला, हे त्या पक्षाला समजत नाही. तुम्हाला पूर्णपणे संपविण्याचा डाव चालू असून त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा, असा टोला पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil slam cm uddhav thackeray for skips meeting with pm modi zws