मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी क्रीडा संकुलाच्या उद्धाटनाआधी भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन केले आहे. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 “ही दडपशाही थांबली नाही तर या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरेल. मी धमकी देत नाही पण वस्तुस्थिती मांडणे हा माझा स्वभाव आहे. देश स्वतंत्र्य झाल्यापासून परकियांच्या एक एक खुणा आपण पुसत आहोत. दुसऱ्या बाजूला टीपू सुलतानचे नाव देण्यासाठी चढाओढ सुरु आहे. हे कोणालाच मान्य नाही आणि त्यासाठी भाजपा आंदोलनाला पाठिंबा देत आहे. ही दंडुकेशाही थांबली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. तिथे नाव आधीपासूनच असेल तर ते काढायलाच पाहिजे,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

टिपूचा राष्ट्रपतींनी केलेला गौरवार्थ उल्लेख भाजपा विसरले का?; नामकरणावरुन सचिन सावंत यांचा सवाल

मनसेसोबत युती नाही – चंद्रकांत पाटील

“गेल्या वेळी मुंबईत भाजपाचा महापौर होत होता. राज्य सुरळीत चालवण्यासाठी अमित शाह यांनी मुंबई महापालिका शिवसेनेला देण्यास सांगितले. मात्र आता आम्ही ऐकणार नाही. महापौर भाजपाचा होण्यासाठी जी संख्या लागते त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडूण येतील. भाजपा मनसेसोबत युती करणार नाही. राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करण्याचा भाजपाचा प्रस्ताव नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी टिपू सुलतानवरून मुंबईत गदारोळ झाला आहे. मालाडमधील क्रीडा मैदानाचे टिपू सुलतान असे नामकरण करण्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आघाडी सरकारचे मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. हे नाव म्हैसूरचे माजी शासक टिपू सुलतान यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मालवणी हा अस्लम शेख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil warning on renaming tipu sultan of sports complex abn
First published on: 26-01-2022 at 20:59 IST