लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकांची निवडणूक १९ एप्रिलला

महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील यशानंतर लातूर, चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपलिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चंद्रपूर (६६ जागा), लातूर (७० जागा) आणि परभणी (६५ जागा) या तीन महानगरपालिकांची निवडणूक १९ एप्रिलला होणार असून, मतमोजणी २१ तारखेला होईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी जाहीर केले. २७ मार्च ते ३ एप्रिल या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, या तिन्ही महानगरपालिका हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. लातूरमध्ये काँग्रेस तर परभणीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. लातूर जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर लातूरची महानगरपालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा निर्धार आहे. पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील आणि काँग्रसचे स्थानिक आमदार अमित देशमुख या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. लातूर जिल्ह्य़ात भाजपने यश मिळविले असले तरी लातूर पंचायत समितीत मात्र काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत आमदारकी वाचविण्यासाठी अमित देशमुख यांनी सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे.

चंद्रपूरमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस होईल. परभणीमध्ये राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्याकरिता बरेच प्रयत्न करावे लागतील. लातूर आणि चंद्रपूरच्या तुलनेत परभणीमध्ये भाजपची तेवढी ताकद नाही. परभणीत भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त आहे. मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने थेट राष्ट्रवादीला मदत केली होती.

पनवेल महापालिका निवडणूक मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता

पनवेल : सोमवापर्यंत पालिकेकडे एक लाख ९४ हजार हरकती विविध राजकीय पक्षांनी व सर्वसामान्य मतदारांनी नोंदविल्यामुळे निवडणूक आयोगाने जोपर्यंत सर्वसामान्य मतदारांचे समाधान होत नाही तोपर्यंत मतदानाची घाई नको, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. पनवेल महापालिकेमध्ये साडेचार लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यामुळे आता मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती सुरू असून, मे महिन्यातील १० ते १५ तारखेपर्यंत पालिकेच्या निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता पालिका सूत्रांकडून समजते.

पनवेल महापालिका निवडणुकीची प्रक्रिया राबविताना उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक निवडणूक कामात न केल्याचा तसेच महापालिका प्रशासनामध्ये निवडणुकीचे काम अनुभवी कर्मचारीवर्गाकडून न केल्याचा फटका पनवेल पालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला बसला आहे. प्रभाग एकीकडे आणि मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागामध्ये असा घोळ पालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यावर उजेडात आला. पहिल्यांदा यादी प्रसिद्ध केल्यावर मतदार यादीतील हा घोळ जाणीवपूर्वक केल्याचे भारतीय जनता पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर मांडले. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोठय़ा प्रमाणात मतदारांचे प्रभाग बदलल्याचा घोळ निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिला. भाजपप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हरकतींवर दुरुस्तीची मागणी केली आहे.

मतदार याद्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. मे महिन्यात मतदान झाल्यास मतदार हा सुट्टय़ांमुळे गावी जाण्याची शक्यता आहे. तसे सर्वसामान्यांचे नियोजन त्याचपद्धतीचे असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदान एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिना संपल्यावर घ्यावे   प्रशांत ठाकूर, आमदार

कोणताही मतदार वंचित राहू नये अशी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे. पनवेल पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या घोळाची दुरुस्ती निवडणूक आयोगाने करावी.    विवेक पाटील, शेकाप नेते

untitled-14