Premium

“जे घडले तेच सांगितले”, फडणवीसांनी ज्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याचाच व्हिडीओ पोस्ट करत बावनकुळे म्हणाले…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्याला धक्काबुक्की झाली असा आरोप आहे त्याचाच व्हिडीओ पोस्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

devendra fadnavis reaction on chandrashekhar bawankule
चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीनी नागपूरमधील पुराची पाहणी करताना एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे त्याचाच व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. यात त्यांनी देवेंद्रजी फडणवीसांवर आरोप करणारे विरोधक तोंडावर आपटले, असं म्हटलं. तसेच त्या व्यक्तीने जे घडले तेच सांगितले आणि त्या व्हायरल व्हिडीओचे हे आहे सत्य, असंही नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नागपुरातील पूरपरिस्थितीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका नागरिकाचा हात ओढला, असा आरोप करीत विरोधकांनी सोशल मीडियावर एक विपर्यस्त व्हिडीओ व्हायरल केला होता. या व्हिडिओत दिसत असलेल्या व्यक्तीचा देवेंद्र फडणवीस यांनी हात ओढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पण यामागील वस्तूस्थिती आणि सत्य आता अखेर उघड झाले आहे. त्या संबंधित व्यक्तीने स्वत:हून समोर येत या विषयातील वस्तूस्थिती आज जनतेसमोर कथन केली.”

“सुरक्षारक्षक आणि पोलीस मला फडणवीसांपर्यंत पोहचू देत नव्हते”

“या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या भागात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी नागरिकांशी ते चर्चा करीत असताना गर्दीमुळे सुरक्षारक्षक आणि पोलीस मला फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू देत नव्हते. ही गोष्ट फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी माझा हात धरला आणि चल बाबा मी तुझ्या घरी येतो असे म्हणत मला ते माझ्या घरी पाहणी करायला घेऊन गेले,” अशी माहिती बावनकुळेंनी दिली.

हेही वाचा : “भाजपाविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस”

“आता स्वतः या नागरिकानेच वस्तूस्थिती समोर आणल्याने कालपासून कोल्हेकुई करणारे विरोधक आणि त्यांची भाडोत्री ट्रोलर्स मंडळी तोंडावर आपटली आहेत. ‘सत्य अस्वस्थ होईल, पण पराभूत होत नाही’ या उक्तीचे यानिमित्ताने प्रत्यंतर आले आहे. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे. या देवमाणसावर केलेले खोटे आरोप जास्त काळ टिकत नाहीत. त्यांचे विरोधक तोंडघशी पडतात हा अनुभवही यानिमित्ताने आला असेल,” असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule post video about opposition allegation on devendra fadnavis pbs

First published on: 26-09-2023 at 09:18 IST
Next Story
गणेश दर्शनासाठी गुजरातमधून रोज ६० खासगी बस; गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दर्शनाचीही हौस