पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत गोखले पुलाच्या पोलादी गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
गोखले पुलासाठी पोलादी गर्डर उभारण्यासाठी अंधेरी स्थानकाच्या पाचव्या मार्गिकेवर फलाट क्रमांक ९ वर रात्री ९.३० ते पहाटे ५.३० पर्यंत आणि अंधेरी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या, जलद मार्गावर शनिवारी १२.१० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. शनिवारी रात्री १२.१० ते पहाटे ४.४० वाजेदरम्यान अप जलद दिशेकडील लोकल गाडय़ा गोरेगावपर्यंत धावतील. गोरेगाव स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ वरून जादा लोकल गाडय़ा सोडण्यात येणार असून गोरेगाव ते चर्चगेट या मार्गावर हार्बर किंवा अप धिम्या मार्गावरून प्रवास करता येईल, अशी माहिती प. रेल्वेकडून देण्यात आली.
दरम्यान, मध्य रेल्वेवरील निळजे ते तळोजे-पांचनंद स्थानकापर्यंत शुक्रवारी मध्यरात्री १.५० ते रात्री ३.५० पर्यंत ब्लॉक विशेष ब्लॉक घेण्यात येईल.
विरार ते चर्चगेट शेवटची जलद लोकल विरारहून रात्री ११.१५ वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री १२.४२ वाजता पोहचेल.
वसई रोडवरून अंधेरीकडे जाणारी शेवटची अप धिमी लोकल वसई रोडवरून रात्री ११.१५ वाजता सुटून अंधेरीला रात्री १२.०४ वाजता पोहचेल.
बोरिवली ते चर्चगेट ही शेवटची अप धिमी लोकल बोरिवलीहून रात्री ११.३४ वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री १२.३९ वाजता पोहचेल.
१० मार्च रोजी बरौनी-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत चालवण्यात येईल. ११ मार्च रोजी ओखा – मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल बोरिवली येथे ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. भुज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस बोरिवली येथे १५ मिनिटे थंबवण्यात येईल. अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस लोकशक्ती एक्स्प्रेस, वेरावल – वांद्रे टर्मिनस सौराष्ट्र जनता आणि एकता नगर – दादर सुपरफास्ट एक्स्प्रेस अंधेरी स्थानकातून चालवण्यात येईल. तसेच, फलाटांची लांबी कमी असल्याने एक्स्प्रेसला दोनवेळा थांबा देण्यात येईल.