मुंबई : यंदा हवामानात झपाट्याने होणारे बदल हा चिंतेचा विषय ठरत असून पॅसिफिक ओशन म्हणजेच प्रशांत महासागरात होणाऱ्या बदलाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. येथील हवामान स्थितीचा परिणाम जागतिक हवामानावर होत असतो. प्रशांत महासागरात यंदा ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक पातळीवर तापमान वाढ, चक्रीवादळे, कमी पाऊस तसेच काही भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते.

जगाचे लक्ष ”पॅसिफिक महासागराकडे का ?

जागतिक पातळीवर सध्या प्रशांत महासागर हा चर्चेचा विषय ठरला आहे. यंदा ‘एल निनो’ ची अधिक तीव्र स्थिती म्हणजे ‘सुपर एल निनो’ विकसित होईल, अशीही शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. ‘एल निनो’ ची तीव्रता ही प्रशांत महासागरातील उष्णता किती आहे आणि वाऱ्यांची स्थिती काय आहे यावर अवलंबून असते.

हवामान शास्त्रज्ञांकडून ही स्थिती ठरविण्यासाठी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पुष्ठभागातील तापमानात झालेल्या बदलांची तुलना दीर्घकालीन सरासरीशी केली जाते. अभ्यासकांच्या मते, सध्या ‘एल निनो’ स्थिती प्रशांत महासागरात आधीच्या काही घटनांच्या तुलनेत अधिक वेगाने विकसित होत आहे.यामुळे सध्या साऱ्या जगाचे लक्ष प्रशांत महासागराकडे आहे.

जागतिक पातळीवर काय परिणाम ?

‘एल निनो’ स्थितीत मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडते. यामुळे जागतिक तापमानात वाढ होते. हवामान अभ्यासकांच्या मतानुसार, २०२३ या वर्षात जेव्हा ‘एल निनो’ स्थिती निर्माण झाली होती त्यानंतरच्या काळात जागतिक तापमानात मोठी वाढ नोंदली गेली होती. आतपर्यंत २०२४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते. हवामानाच्या या स्थितीचा प्रभाव दीर्घकाळ राहतो, साधारणपणे एप्रिलनंतर ‘एल निनो’ स्थिती निर्माण होऊन डिसेंबर महिन्याच्या आसपास या स्थितीची तीव्रता अधिक असते. जागतिक पातळीचा विचार करता या स्थितीच्या प्रभावामुळे काही ठिकाणी दुष्कळसदृश्य स्थिती तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असते.

भारतावर ‘एल निनो’ चा काय परिणाम ?

भारतात वर्षभर पडणाऱ्या पावसाच्या ७५ टक्के हून अधिक पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडत असतो. आणि या पावसावर ‘एल निनो’ ही स्थिती प्रभाव टाकत असते. तर ‘ला निना ’ स्थितीत मादागास्करकडे उतरलेले थंड वारे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून भारतात मान्सून आणतात. त्यामुळे ‘ला निना’ स्थिती भारतासाठी पोषक आहे. याउलट ‘एल निनो’चा परिणाम भारतातील मान्सूनवर होऊन पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. यामुळे या वर्षीच्या हंगामात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.