scorecardresearch

मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर शिक्षणमंत्र्यांचे ताशेरे; उदय सामंत यांच्याकडून ग्रंथालयाची पाहणी

जुन्या इमारतीची डागडुजी करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ही दुरुस्ती सुरू असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही

उदय सामंत यांच्याकडून ग्रंथालयाची पाहणी

मुंबई : मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची दुरवस्था, पुस्तकांना लागलेली वाळवी याबाबत विद्यापीठावर टीका होताच ही वापरातील पुस्तके नसून रद्दी असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. परंतु विद्यापीठाच्या हलगर्जीबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ताशेरे ओढले असून बुधवारी त्यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाची पाहणी केली.

‘पुस्तके अस्ताव्यस्त टाकल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. अत्यंत वाईट स्थितीत असलेली ही पुस्तके जतन करण्याची जबाबदारी विद्यापीठाची असली तरी आता शासन यात लक्ष घालेल,’ असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

जुन्या इमारतीची डागडुजी करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ही दुरुस्ती सुरू असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही. परंतु मोडकळीस आलेली इमारत दुरुस्त करण्यात निधी वाया घालवण्याचे काय कारण, नवी इमारत तयार असूनही ती वापरात का नाही असा प्रश्न सामंत यांनी विद्यापीठाच्या अभियंत्यांना विचारला.

नव्या इमारतीला पालिकेचे निवासी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी अभियंत्यांनी दिले असता ग्रंथालयाच्या निवासी प्रमाणपत्रासाठी तात्काळ बैठक घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, परीक्षा भवन व इतर सर्व इमारतींचा पाहणी दौरा २ मार्च रोजी करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची नवी इमारत तयार असूनही विद्यापीठाने ती वापरात आणलेली नाही. तर दुसरीकडे मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीची डागडुजी सुरू आहे. या डागडुजी दरम्यान विद्यापीठाने पुस्तकांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. दुर्मीळ पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे अस्ताव्यस्त पडली आहेत. काही पुस्तके पोत्यात, काही सिमेंट वाळूच्या ढिगाऱ्यालगत पडली आहेत. अनेक पुस्तके वाळवीने खाल्ली आहेत.

 ग्रंथालयाच्या दुरवस्थेबाबत आक्षेप घेतल्यानंतर ही पुस्तके जीर्ण आणि कालबाह्य झाली असून ती रद्दीत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले. परंतु ग्रंथसंपदा कधीही कालबाह्य होत नसते. कुलगुरू वेळोवेळी भेट देऊनही त्यांना पुस्तकांची दुरवस्था दिसली नाही हे आश्चर्य आहे. तसेच देणगीदारांकडे जागा नसल्याने त्यांनी विद्यापीठाला पुस्तके देणगी स्वरूपात दिल्याचे विधान करून विद्यापीठाने देणगीदारांचा अवमान केला आहे.  – अ‍ॅड वैभव थोरात, अधिसभा सदस्य

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Charge of mumbai university library inspection by uday samant akp

ताज्या बातम्या