हॉटेलमधले खाद्यपदार्थ, टॅक्सी-रिक्षा व ‘बेस्ट’ भाडेवाढ, भाज्यांच्या वाढत्या किंमती, पेट्रोलच्या दरातील वाढीची झळ वेळोवेळी नागरिकांना सोसावी लागते. यात आता जेवणाच्या डब्यांचीही भर पडली आहे. जेवणाचे डबे ने-आण करण्याच्या दरात या जून महिन्यापासून डबेवाला संघटनेने काही प्रमाणात वाढ केली आहे. आता साध्या व विशेष डब्यासाठी ग्राहकांना अनुक्रमे १०० व १५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
मुंबई डबेवाला संघटनेचे प्रमुख रघुनाथ मेदगे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांप्रमाणेच मुंबईच्या डबेवाल्यांनाही सोसावी लागत आहे. सर्वच क्षेत्रात झालेल्या महागाईचा फटका आमच्या डबेवाल्यांनाही बसला आहे आणि त्यामुळे जेवणाच्या डब्यांच्या ने-आण करण्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यामुळे डबेवाल्याच्या मासिक वेतनात काही प्रमाणात वाढ होईल. जून महिन्यापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.