शीना बोरा हत्याप्रकरणी तिची आणि प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्यासह तिचा माजी पती संजीव खन्ना आणि माजी चालक श्यामवर राय यांच्याविरोधात सीबीआयने गुरुवारी महानगरदंडाधिकारी न्यायालयासमोर १००० पानी आरोपपत्र दाखल केले. तीन महिन्यांपूर्वी हे हत्या प्रकरण उघडकीस आले होते.
अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी आर. व्ही. अदोणे यांच्यासमोर सीबीआयने गुरुवारी इंद्राणी व अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. इंद्राणी हिने खन्ना व राय यांच्या साथीने शीनाच्या हत्येचा कट रचला. तसेच तीन वर्षांपूर्वी तिने या कटाची अंमलबजावणी करत शीनाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा मुख्य आरोप सीबीआयने इंद्राणीसह अन्य दोन आरोपींवर ठेवला आहे.

पीटर मुखर्जीला अटक
शीना बोरा हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी याला या हत्या प्रकरणी अटक केल्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पीटरला तब्बल दोन-तीन वेळा चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी त्याच्याकडून विसंगत माहिती दिली जात असल्याचेही सांगितले गेले. परंतु पीटरला अटक करण्यात आली नव्हती. सीबीआयच्या चौकशीतही पीटर मुखर्जीच्या जबाबात विसंगती आढळल्यानेच या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती
पोलीसांनी दिली.