मुंबई : ‘प्राच्यविद्या’ क्षेत्रात संशोधन करणाऱ्या दक्षिण मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकीचा विषय दिवसेंदिवस गुंतागुंतीचा बनत चालला आहे. २०२३ मध्ये ‘एशियाटिक’वर निवडून आलेल्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रतेचा विषय उद्भवला असून यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे बुधवारी सुनावणी आहे.
एका बाजूला ‘एशियाटिक’वर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना दुसरीकडे मावळत्या व्यवस्थापन समितीने १३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा दिवस निश्चित केला आहे. ८ नोव्हेंबर रोजी १९ जागांसाठी ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक होती. पण, मतदार याद्यांवर भाजपच्या विनय सहस्राबुद्धे गटाने आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली होती. धर्मादाय आयुक्तांनी ३ ऑक्टोबरपर्यंतच्या सभासदांना मतदानास पात्र ठरवले. त्याविरोधात काँग्रेसच्या कुमार केतकर गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवत मतदार याद्या अद्यायावत करण्याचे आदेश सोसायटीला दिले. त्यामुळे ८ नोव्हेंबरची निवडणूक स्थगित करण्यात आली. अशातच एशियाटिकच्या जुन्या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांसमोर बुधवारी सुनावणी होत आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नियमबाह्य असल्याने त्यावेळी निवडून आलेले व्यवस्थापन समितीचे सदस्य अपात्र ठरतात, अशी तक्रार धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे नव्या कार्यकारिणीचा बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केला नव्हता. संस्थेने त्याविरोधात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील केलेले होते. त्याची सुनावणी बुधवारी आहे. धर्मादाय आयुक्त यावर काय निर्णय देतात याची उत्सुकता आहे.
सर्व पक्षांकडून सदस्य नोंदणी
८ नोव्हेंबर रोजीच्या निवडणुकीसाठी भाजपचा सहस्राबुद्धे गट, काँग्रेसचा केतकर गट आणि विद्यामान कार्यकारणीमधील पदाधिकाऱ्यांचा गट अशी तिरंगी लढत होणार होती. त्यासाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. आता १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत १५ ऑक्टोबरपर्यंतच्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), वंचित या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीस राजकीय रंग चढला आहे.
